होमपेज › Konkan › बंदी कागदावर, पर्यटक धबधब्यावर!

बंदी कागदावर, पर्यटक धबधब्यावर!

Published On: Jul 22 2018 10:35PM | Last Updated: Jul 22 2018 8:43PMरत्नागिरी ः प्रतिनिधी

तालुक्यातील रानपाट येथील धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला असून, येथे पर्यटकांची गर्दी होत आहे. दरम्यान, काही अतिउत्साही पर्यटक प्रशानाचा बंदी आदेश झुगारून या धबधब्यात उतरत असल्याने येथे अपघाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उक्षी येथून जाणारे पर्यटक रेल्वे मार्गावरून जात असल्याने पर्यटक जोखीम पत्करुन या धबधब्याकडे जात आहेत.

शासन दरबारी नोंद असलेल्या रानपाट कडा येथील धबधबा बारमाही वाहतो. याच धबधब्यावर उक्षी येथून जाण्यास मार्ग असल्याने त्याला उक्षीचा धबधबा असेही संबोधण्यात येते. कोकण रेल्वेने प्रवास करताना लाजूळ आणि रानपाट या दोन भुयारी मार्गाच्या मधोमध असणारा हा धबधबा प्रवाशांचे लक्ष आकर्षित करतो. त्यामुळे येथे येणार्‍या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उक्षी पेक्षा रानपाट मार्गे जाताना येथे जाणे अधिक सुरक्षित ठरते. येथील ग्रामस्थांनी या मार्गावरील झाडी तोडून हा मार्ग अधिक सुरक्षित केला आहे. 

राजापूर तालुक्यातील सवतकडा येथील धबधब्यावर पर्यटक अडकल्याची घटना घडल्यावर जिल्हाधिकारी यांनी धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांना प्रवेश करण्यात बंदी घातली आहे. मात्र, येथे येणारे काही अतिउत्साही पर्यटक हा बंदी आदेश झुगारून पाण्याच्या प्रवाहात उतरत आहे. येथे एक होमगार्ड तैनात करण्यात आला आहे. त्याच्याकडून येथे येणार्‍या पर्यटकांना सूचना देण्यात येतात. मात्र, त्याच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून काही पर्यटक पाण्यात उतरत आहेत. त्यामुळे येथे बंदोबस्त वाढवावा, अशी मागणी रानपाट सरपंच स्मिता गोनबरे यांनी केली आहे. 

सूचना फलकांची नासधूस

जिल्हा प्रशासनाने धबधब्यावर बंदी घातल्यानंतर पंचायत समितीमार्फत धोकादायक धबधबे असणार्‍या ग्रामपंचायतींना धोक्याची सूचना देणारे फलक त्या ठिकाणी उभारण्याची सूचना करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी करताना रानपाट ग्रामपंचायतीने असे सूचना फलक उभारले होते. परंतु, कोणीतही हे फलक फाडून टाकले असून, याबाबतची तक्रार जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करणार असल्याचे सरपंच स्मिता गोनबरे आणि पोलिस पाटील सुनील गोनबरे यांनी सांगितले.