Wed, Aug 21, 2019 06:05



होमपेज › Konkan › बाळशास्त्री जांभेकर स्मारक पत्रकारांसाठी स्फूर्तिदायक

बाळशास्त्री जांभेकर स्मारक पत्रकारांसाठी स्फूर्तिदायक

Published On: Jan 12 2019 11:53PM | Last Updated: Jan 12 2019 10:28PM




सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी   

ज्या जिल्ह्यात बाळशास्त्री जांभेकरांसारख्या केवळ आद्य पत्रकारच नव्हे तर शिक्षणतज्ज्ञ, समाज सुधारक अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा जन्म झाला, त्या जिल्ह्यात त्यांचे स्मारक उशिराने का असेना पण ते होत आहे आणि याचा एक भाग होण्याचे भाग्य आपल्याला लाभले हे आपले भाग्य आहे. असे सांगतानाच हे स्मारक पूर्णपणे शासनाच्या खर्चाने होणार तर मग याची मालकी पत्रकार संघाची कशी राहणार हे पाहणे आवश्यक होते. त्यामुळे या स्मारकाला होण्यास थोडा वेळ लागला. मात्र, तरीही याची मालकी पत्रकारांचीच राहील आणि हे पहिल्यांदाच या सिंधुदुर्गात होत आहे. या पत्रकार भवन आणि आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक हे जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील पत्रकारांचे स्फूर्तीस्थान ठरेल, असा विश्‍वास पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री दीपक केसकर यांनी व्यक्त केला. 

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवन इमारतीचा भूमिपूजन समारंभ पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला. सिंधुदुर्गनगरीतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेजारी 11 गुंठे क्षेत्रात या पत्रकार भवनाची उभारणी होत आहे. भूमिपूजन समारंभानंतर येथील जिल्हा नियोजन समितीच्या जुन्या सभागृहात आयोजित मुख्य समारंभात व्यासपीठावर आ. वैभव नाईक, आ.नितेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, राज्य मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, विश्‍वस्त किरण नाईक, परिषद प्रतिनिधी शशी सावंत, अभिनेते दिगंबर नाईक, सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन नाईक, सचिव गणेश जेठे आदी उपस्थित होते. तर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला ओरोस सरपंच प्रीती देसाई, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, ओरोस पंचायत समिती सदस्य सुप्रिया वालावलकर, जि. प. सदस्या श्रीया सावंत, ज्येष्ठ पत्रकार माधव कदम, अण्णा केसरकर यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, जिल्ह्यातील पत्रकार व नागरिक उपस्थित होते.

पालकमंत्री दीपक केसकर म्हणाले की, साडे चार कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणारे बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवन राज्यातील पत्रकारांचे प्रेरणास्थान होईल. या पत्रकार भवनात अद्ययावत सभागृह, सिंधुदुर्गनगरीस भेट देणार्‍या पत्रकार व पर्यटकांसाठी आठ सूट, व्यापारी गाळे, बाळशास्त्री जांभेकर यांचा पुतळा असे राज्यात आदर्शवत अशा पत्रकार भवनाची उभारणी होईल. कमीत कमी वेळात या पत्रकार भवनाची उभारणी होईल. या पत्रकार भवनाच्या माध्यमातून सर्व पत्रकारांमधे अजून अधिक घट्ट एकजूट आणि अधिक चांगले लिखाण होईल असा विश्‍वासही व्यक्त केला. जि. प. अध्यक्ष संजना सावंत यांनी हे पत्रकार भवन म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासामध्ये योगदान देणार्‍या पत्रकारांसाठी स्फूर्ती देणारे ठरणार आहे असे उद्गार काढले.

आ. नितेश राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उभारण्यात येणारे बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक व पत्रकार भवनची  इमारत हे भव्य असे स्मारक होत आहे. हे स्मारक लवकरात लवकर आणि कमीत कमी वेळात पूर्ण व्हावे आणि भूमिपूजन समारंभ जरी छोटेखानी झाला तरी याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम असा भव्यदिव्य व्हावा की राज्यातीलच नाही तर पूर्ण देशातील पत्रकार आणि जनता यांच्या नेहमी ध्यानात राहिला पाहिजे असे म्हणाले. आ. वैभव नाईक म्हणाले की, सिंधुदुर्गनगरी येथील बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवन हे राज्यात आदर्शवत ठरेल. मराठी वृत्तपत्र सृष्टीसाठी प्रेरणादायी असलेले बाळशास्त्री जांभेकरांचे हे स्मारक सर्वच दृष्टीने वृत्तपत्र सृष्टीतील कार्यरत असलेल्या सर्व मराठी तसेच इतर भाषीक पत्रकारांसाठीही प्रेरणादायी ठरेल.

पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा म्हणाले की, युती शासनाच्या काळातच पत्रकारांच्या बहुतांश मागण्या पूर्ण होण्याबरोबरच राज्यात विविध जिल्ह्यात पत्रकार भवनांची उभारणी झाली आहे. शासनाने नवीन जाहिरात धोरण, पत्रकार संरक्षण कायदा, पत्रकारांना पेन्शन योजना आदी मागण्या मंजूर केल्या आहेत. त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी. पत्रकार परिषदेचे विश्‍वस्त किरण नाईक यांनी बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक व पत्रकार भवनाचे महत्व विषद करताना सिंधुदुर्गमध्ये पत्रकारितेचे आद्य जनक असलेल्या जांभेकरांचे स्मारक नव्हते. ती उणीव आता भरून निघाली आहे. या स्मारकाचे काम पूर्ण होण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन याचा पाठपुरावा करण्याची गरज आहे. मतभेद विसरून सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन त्यांनी केले.

अभिनेता दिगंबर नाईक शुभेच्छापर भाषणात म्हणाले की, सर्व पत्रकार या चांगल्या कामासाठी एकत्र आले याचा मला विशेष आनंद होत आहे. पत्रकारांनी आमच्याबद्दल चांगला लिवुक व्हया इतकीच अपेक्षा आसा, त्यांनी यावेळी ‘हम सब एक है’ ही कविता सादरीकरणाबरोबरच सामूहिक गार्‍हाणेही घातले.  जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी स्मारकाच्या उभारणीच्या कामास शुभेच्छा दिल्या.
सुरुवातीस जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन नाईक यांच्या हस्ते कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचा सत्कार व स्वागत करण्यात आले. तसेच स्मारक व पत्रकार भवनसाठी सहकार्य केलेल्या प्रशासकीय अधिकारी, वास्तुविशारद, ज्येष्ठ पत्रकार यांचाही सत्कार करण्यात आला.

जिल्हा पत्रकार  संघाचे अध्यक्ष गजानन नाईक यांनी प्रस्तावनेमध्ये बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक आणि पत्रकार भवनाच्या निर्मितीसाठीच्या कार्यवाहीचा आढावा घेतला. गेल्या कित्येक वर्षांचे जिल्ह्यातील पत्रकारांचे स्वप्न पूर्ण होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. अनेक अडचणींवर मात करत आज पत्रकार भवन उभे रहात असल्याबद्दल त्यांनी जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचे अभिनंदन केले. सूत्रसंचालन पत्रकार संघाचे सचिव गणेश जेठे यांनी केले. तर उपाध्यक्ष बाळ खडपकर यांनी आभार प्रदर्शन केले.

पत्रकारांना निवृत्ती वेतनाचा शासन निर्णय आठ दिवसात

नवीन जाहिरात धोरण, पत्रकार संरक्षण कायदा आदी मागण्यांबरोबरच पत्रकारांना निवृत्ती वेतन लागू करण्यासाठी गेल्या अधिवेशनात शासनाने पंधरा कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हा निधी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे वर्ग करण्यात आला असून आठ दिवसात याबाबत शासन निर्णय काढण्यात येईल असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, युती शासन काळातच पत्रकार भवनांची निर्मितीसाठी निधी असो किंवा पत्रकार बांधवांच्या मागण्यांची पूर्तता झाली आहे.