Wed, Jun 26, 2019 23:59होमपेज › Konkan › ‘बजरंग-55’ रणगाडा देवरुखात

‘बजरंग-55’ रणगाडा देवरुखात

Published On: Feb 01 2018 11:22PM | Last Updated: Feb 01 2018 10:40PMदेवरुख : प्रतिनिधी

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या शहीद जवान स्मारकासाठी संरक्षण मंत्रालयाने मंजूर केलेला बजरंग-55 हा रणगाडा देवरुखला गुरुवारी सकाळी 12 वाजता दिमाखात दाखल झाला.या रणगाड्याचे स्वागत करण्यासाठी पदाधिकारी, माजी सैनिक, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. सन 1965 व 1972 च्या पाकिस्तान विरोधी लढ्यात ‘बजरंग’ या रणगाड्याने विजयी भूमिका निभावली होती. शौर्याचे प्रतीक असलेला हा ‘बजरंग’ रणगाडा तोफेसह तीस फूट लांब व 10.5 फूट रुंद असा आहे.लष्करप्रमुख रावत यांनी प्रत्येक शहरात शहीद जवानांच्या स्मृती जपणारी स्मारके व्हायला हवीत, अशा ठिकाणी युद्ध सामुग्रीचे प्रदर्शन व्हायला हवे, असे सांगितले होते.

त्याच धर्तीवर देवरुख येथे शहीद जवान स्मृती जपणारे स्मारक होत आहे, असे मदन मोडक यांनी सांगितले. खडकी पुणे येथून हा रणगाडा आणण्यात आला आहे. देवरुख येथील स्मारक जागेत हा रणगाडा स्थानापन्न करण्यासाठी चिपळूण येथील तीन क्रेनची मदत मिळाली.रणगाडा मिळवून देण्यासाठी रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, संजू बर्वे, अधिकारी भांबरे यांचेही सहकार्य मिळाले. रणगाडा स्थानापन्न होताना देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत, उपाध्यक्ष मदन मोडक, सचिव सौरभ घाणेकर, प्राचार्य डॉ.नरेंद्र तेंडोलकर, प्रा.वर्षा फाटक यांच्यासह माजी सैनिक अमर चाळके, चंद्रकांत चाळके, पुंडलिक पवार, महेश सावंत, सूर्यकांत पवार, तुकाराम खेडेकर, शरद जागुष्टे, चंद्रकांत जागुष्टे उपस्थित होते.

या रणगाड्यामुळे मुलांना देशभक्‍तीची प्रेरणा मिळणार आहे. जवानांच्या स्मृती जपण्यासाठी नव्या पिढीला इतिहास माहिती व्हावा, यासाठी हे स्मारक दीपस्तंभ ठरणार आहे. याच स्मारकासाठी एक तोफही मंजूर झाली आहे. या स्मारकात परमवीर चक्रप्राप्त वीरांचा इतिहास उपलब्ध होणार आहे. मदन मोडक आणि सदानंद भागवत यांनी या स्मारकासाठी योगदान दिले आहे. देवरुखमध्ये होणारे हे शहीद जवान स्मृती स्मारक कोकणातले पहिले ठरणार आहे. 35 लाख खर्च अपेक्षित आहे. स्मारकाचे काम सुरु असून मार्चच्या पहिल्या आठवड्यात काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.