होमपेज › Konkan › सिंधुदुर्गात बीएसएनलची सेवा कोलमडलेलीच!

सिंधुदुर्गात बीएसएनलची सेवा कोलमडलेलीच!

Published On: Dec 28 2017 1:31AM | Last Updated: Dec 27 2017 8:20PM

बुकमार्क करा
कणकवली : नितीन कदम

‘डिजिटल इंडिया’ क्रांती घडविण्याची स्वप्ने पहाणार्‍या बीएसएनएल  या सरकारी मालकीची सेवा किमान सिंधुदुर्गात तरी पुरती कोलमडली आहे.  कंपनीच्या मोबाईल, ब्रॉडबॅण्ड, लँडलाईन अशा सर्वच सेवा वारंवार विस्कळीत होत असल्याने त्याचा नाहक  फटका  ग्राहकांना बसत आहे. यामुळे दूरसंचारचे सिंधुदुर्गातील  ग्राहक कमालीचे नाराज आहेत. विशेष म्हणजे, दूरसंचारला सर्वाधिक उत्पन्न देण्यात सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रात अव्वल असूनही दूरसंचारच्या सेवेचा दर्जा मात्र निकृष्ट आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे तीन लाख 51 हजारपेक्षा जास्त भ्रमणध्वनी कनेक्शने बीएसएनएलची आहे.त्यात पोस्टपेड 2 हजार पाचशे, व्हील 6 हजार 300, ब्रॉडबँड  7  हजार 450, लँडलाईन 24 हजार 620, तर प्रीपेड मोबाईल 3 लाख 48 हजार 560 ग्राहक आहेत.  सिंधुदुर्ग जिल्हा डोंगराळ आहे.  एका बाजूला सह्याद्री पट्ट्याच्या दर्‍याखोर्‍यातील  लोकवस्ती तर दुसर्‍या बाजूला अथांग सागरी किनारा आहे. या भौगोलीक परिस्थिती मुळे दूरसंचारची मोबाईल सेवा सर्वच गावांमध्ये पूर्ण क्षमतेने मिळत नाही. काही  दुर्गम गावे तर अद्याप मोबाईल सेवेच्या कक्षेतही आलेली नाहीत. 

सिंधुदुर्गात मोबाईल ग्राहक 3 लाख 51 हजारपेक्षा जास्त आहेत. राज्यात पुणे जिल्ह्यानंतर सर्वाधिक ग्राहकसिंधुदुर्गात आहेत. मात्र, जिल्ह्यात बीएसएनएलची ग्राहक संख्या मोठी असूनही ग्राहक सेवा देण्यात कंपनी दिरंगाई करत आहे. नव्याने 184 टॉवर उभारण्याचा निर्णय झाला असला तरी प्रत्यक्षात अंमलबजावणीची प्रतीक्षा आहे. 

बीएसएनएलच्या सेवेची समस्या ग्रामीण भागातच नाही, तर शहरी भागातही ती प्रकर्षाणे जाणवते. सावंतवाडी, कणकवली, कुडाळ सारख्या शहरातही वारंवार नेटवर्क जाम, मध्येच ठप्प होणारी ब्रॉडबॅण्ड व लॅण्डलाईन सेवा, वन वे कॉल आदी समस्यांचा सामना ग्राहकांना करावा लागतो. यामुळे दूरसंचारचे बहुतांश ग्राहक ऑनलाईन सेवांसाठी अन्य खासगी मोबाईल कंपन्यांची सेवा वापरताना दिसतात. दळणवळणाचे प्रमुख साधन बनलेल्या या कंपनीच्या ग्राहकांत सेवेबद्दल प्रचंड नाराजी आहे. मोबाईल आधार लिंक केलेल्या ग्राहकांना कंपनी वारंवार एसएमएस पाठवून आधार लिंकसाठी सतावत असल्याचे दिसून येते. 

ब्रॉडबॅण्ड सेवेला ट्राफिक जामची समस्या

क्षमतेपेक्षा जादा ग्राहकांना ब्रॉडबॅण्ड  कनेक्शन दिल्याने दूरसंचार निगमची सेवा सिंधुदुर्गातच नव्हे तर संपूर्ण कोकणपट्टयात  ही सेवा ट्रॅफिक  जामने त्रस्त आहे.राज्य आणि केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयातील ऑनलाईन सेवा शंभर टक्केने वाढली आहे. ही सर्व ऑनलाईन सेवा बीएसएनएलच्या  ब्रॉडबॅण्डवर अवलंबून असल्याने सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत ट्रॅफिक जामची समस्या गेले काही दिवस भेडसावत आहे. जिल्ह्यात जवळपास 7 हजारांपेक्षा ब्रॉडबॅण्ड जोड देण्यात आले आहेत. या सेवामध्ये हाय स्पीड आणि लो स्पीड बरोबरच अनलिमिटेडच्या सुविधा आहेत. अगदी 500 रूपयापासून 5 हजार रूपयेचे प्लान ग्राहकांनी स्वीकारले आहेत. मात्र, महिन्याचे बिल अदा करूनही सेवा समाधानकारक नाही.

4 जी सेवेची प्रतीक्षा

जिल्ह्यात  अन्य सर्व कंपन्यांची 4 जी ही अद्यावत मोबाईल सेवा सुरू झाली आहे. मात्र, दूरसंचारची सेवा अजूनही 2जी व 3 जी दर्जाची आहे. त्यातही 3 जी सेवा केवळ प्रमुख शहरी भागातील 68 टॉवर वरुन उपलब्ध आहे. तर ग्रामीण भागातील 188 टॉवर आज ही 2 जी तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. काही खासगी कंपन्या आता 5 जी या नेक्स्ट जनरेशन सेवेची तयारी करत असताना बीएसएनलचे ग्राहक अजूनही 4 जी सेवेच्या प्रतीक्षेत आहेत. याचाही परिणाम ब्रॉडबॅण्ड सेवेवर होत आहे.