Sat, May 30, 2020 05:39होमपेज › Konkan › ‘बीएसएनएल’च्या ढिसाळ सेवेने जिल्हावासीय त्रस्त!

‘बीएसएनएल’च्या ढिसाळ सेवेने जिल्हावासीय त्रस्त!

Published On: May 28 2018 1:41AM | Last Updated: May 27 2018 7:46PMसावंतवाडी : दत्तप्रसाद पोकळे

जिल्ह्यात बीएसएनएल नेटवर्क व इंटरनेट सेवेत वारंवार निर्माण होत असलेला अडथळा ग्राहकवर्गाची डोकेदुखी ठरत आहे. पावसाळ्यात बीएसएनएलच्या सेवेचा  पुरता बोजवारा उडत असतानाच यंदा पावसाअगोदरच सावंतवाडी तालुक्यासह पूर्ण जिल्ह्यात बीएसएनएल सेवेचा पूर्णपणे फज्जा  उडाल्याचे चित्र आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बहुतांश भाग हा ग्रामीण व दुर्गम असल्याने बीएसएनएलची सेवा हेच डिजिटल कनेक्टिव्हिटीचे साधन आहे.अनेक गावात केवळ बीएसएनएलची रेंज मिळत असल्याने संपर्क तसेच इंटरनेट सेवेसाठी बीएसएनएलचा वापर अपरिहार्य आहे. बीएसएनएलकडून अनेक गावांमध्ये टॉवर उभारण्यात आले,त्यातून अनेक गावांत बीएसएनएलची सेवा पोहचली,मात्र टॉवर असूनही व्यवस्थित रेंज मिळत नसल्याने या टॉवरचा व बीएसएनएलच्या सेवेचा उपयोग काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. अनेक ठिकाणी टॉवरबाबत समस्यांच्या तक्रारी येत असून,बीएसएनएलकडून त्यावर दुरुस्तीची तात्पुरती मलमपट्टी केली जाते,मात्र काही दिवसांनी विस्कळीत सेवेचे दुखणे पुन्हा उदभवत असल्याने, दूरसंचार सेवेबाबत पुन्हा तक्रारी सुरू होतात.

जवळपास आठ लाखांच्या आसपास वस्ती असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात किमान 3 लाख 66 हजार ग्राहक बीएसएनएलच्या सेवेचा लाभ घेतात. सध्या सिंधुदुर्गच्या ग्रामीण भागाला दूरसंचार सेवेशी जोडण्याचे काम बीएसएनएलकडून सुरू आहे. प्रत्येक ग्रा.पं.ला नेट कनेक्टिव्हिटीने जोडले जात असले तरी,बीएसएनएलच्या सेवेत वारंवार उदभवणारे अडथळे पाहता,ही सेवा ग्रामीण भागाला परिपूर्ण कनेक्टिव्हिटी देणार का,याबाबत साशंकताच आहे.

सद्यस्थिती पाहता इंटरनेट सेवा अत्यंत धीम्या गतीने चालत असून कॉल ड्रॉपची समस्याही वाढली आहे.याशिवाय दूरध्वनी सेवेबाबतही अनेक अडचणी आहेतच.बीएसएनएलचे मुख्यालय असलेल्या सावंतवाडीतच सेवेबाबत अनेक तक्रारी आहेत. त्याशिवाय मालवण,वैभववाडी, दोडामार्ग आदी भागात बीएसएनएलच्या विस्कळीत सेवेची समस्या ऐरणीवर आहे.बर्‍याच जणांकडून इंटरनेट सेवा सुरळीत चालत नसल्याचे सांगितलेे जातेे.ग्रामीण भागात बीएसएनएल सुविधा कार्यान्वित होण्यास वेळ असला तरी शहरातही मोबाईल इंटरनेट सुविधेतह समस्या निर्माण होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ग्राहकामधून तीव्र नाराजी व संताप  व्यक्‍त करण्यात येत आहे.बीएसएनएलच्या या कारभारामुळे अनेक ग्राहक खासगी सेवेकडे वळत असून जिल्हात आता जिओचे आगमन झाले आहे,ज्या गतीने जिओचा विस्तार होत आहे,ते पाहता विस्कळीत सेवेचा शिक्‍का बसलेल्या बीएसएनएलसमोर सेवेचा दर्जा वाढविण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

शासन खासगी मोबाईल कंपन्यांच्या पाठिशी ! 

डिजिटल क्रांतीचे युग असतानाही शासकीय दूरसंचार कंपनी असलेली बीएसएनएल अजूनही या युगांपासून कोसो दूर आहे. जग 5जी च्या उंबरठ्यावर उभे असताना बीएसएनएल अजून 2 व 3जी मध्येच अडकले आहे. खासगी दूरसंचार कंपन्याना वाव मिळावा,यासाठी शासनच आपल्या कंपनीचा विस्तार व आधुनिकीकरण करत नाही. मात्र, याचा फटका बीएसएनएलवर अवलंबून असणार्‍या विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यासारख्या ग्रामीण भागाला बसत आहे. 

पावसाळ्यात सेवा पुरती कोलमडण्याची भीती

महामार्ग चौपदरीकरण कामामुळे केबल उखडून तुटून गेल्याने यंदा उन्हाळी हंगामात बीएसएनएलच्या सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असून मोठं मोठ्या मशिनच्या सहाय्याने रस्ता खोदाई करण्याचे काम जोरदार सुरू आहे. या महामार्गाच्या बाजुनेच  बीएसएनएलची केबल गेली असल्याने या कामादरमयान केबल तुटण्याचे प्रकार सातत्याने होत आहेत. मात्र,  ‘कन्केटींंग इंडिया’चा नारा देणार्‍या भारत दूर संचार निगमने यावर तोडगा काढलेला नाही. त्यामुळे ऐन हंगामात शासकीय कार्यालायसह सर्व सामान्यांची त्रेधा उडाली.जागोजागी बीएसएनएलची केबल उखडून गेली असुन,त्याची तात्पुरती  दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा पावसाळ्यात बीएसएनएलच्या सेवेची काय स्थिती असेल,याचा प्रत्यय सध्या येत आहे. दरवर्षी पावसात बीएसएनएलची सेवा कोलमडते,यंदा महामार्ग कामामुळे या सेवेचा पुरता बोजवारा उडण्याची शक्यता आहे.

क्षमतेपेक्षा ग्राहकांची संख्या जास्त

बीएसएनएलकडून जिल्ह्यात अनेक ठिकाणी टॉवर उभारण्यात आले आहेत. 3 जी टॉवरची संख्या कमी असून बहुतांश टॉवर 2 जी आहेत.काही टॉवर अपग्रेडेड आहेत. टॉवर कमी क्षमतेचे असूनही डिजिटलच्या  नावाखाली बीएसएनएलने अनेक ठिकाणी क्षमतेपेक्षा ग्राहक संख्या वाढविल्याने चांगल्या सेवेचा लाभ ग्राहकांना मिळत नाही.