Thu, May 23, 2019 20:59
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › वेतोरेमध्ये बीएसएनएल अधिकार्‍यांना कोंडले!

वेतोरेमध्ये बीएसएनएल अधिकार्‍यांना कोंडले!

Published On: Jun 26 2018 1:14AM | Last Updated: Jun 25 2018 10:14PMवेंगुर्ले : प्रतिनिधी

वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे गावात असलेल्या बीएसएसएनएलच्या टेलिफोन तसेच मोबाईल सेवेचा गेली दोन वर्षे बोजवारा उडाल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वेतोरे-वरचीवाडी येथे असलेल्या बीएसएनएलच्या एक्स्चेंजमधील सब डिव्हिजनल अधिकारी 

सी. बी. महाजन, उपअभियंता पी. बी. कुंभार यांना सलग चार तास कोंडून ठेवले. यावेळी ग्रामस्थानी माघार न घेता अगोदर आपल्या समस्या सोडवण्यासाठी बीएसएनएलचा जबाबदार अधिकारी येथे बोलावण्यात यावा, असा आग्रह धरला. अखेरीस पोलिस उपनिरीक्षक प्रवीण नाईक यांनी घटनास्थळी धाव घेत बीएसएनएलच्या अधिकार्‍यांना बाहेर काढले. याप्रश्‍नी स्वतः पोलिस बीएसएनएलला पत्र पाठवून येत्या 10 दिवसात समस्या सोडवण्यात येतील असे लेखी आश्‍वासन घेतल्यानंतर ग्रामस्थांनी माघार घेतली. 

वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे गावासाठी मोबाईल तसेच टेलिफोन सुविधा पुरवण्यासाठी गावातील वरचीवाडी येथे ग्रा.पं. च्या इमारतीत बीएसएनएलचे एक्स्चेंज कार्यालय आहे. याशेजारी गावासाठी मोबाईल टॉवरही उभारण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या दोन वषार्ंत गावात सगळीकडे बीएसएनएलची सेवा पुरती विस्कळीत झाली आहे.टेलिफोन लाईनमध्ये सतत बिघाड तर मोबाईलला रेंज नाही, नेटवर्क कजेशन, इंटरनेट सुविधेचा बिघाड हे प्रश्‍न ग्रामस्थांना सतावत आहेत. वेतोरे गावसाठी स्वतंत्र मोबाईल टॉवर असून देखील या समस्या उद्भवत असल्यामुळे ग्रामस्थांनी सातत्याने या कार्यालयाशी संपर्क साधला होता.

गावात असलेले लाईनमन एल. एस. चव्हाण यांची वेळोवेळी अनुपस्थिती वाढल्यामुळे लाईनमधील बिघाड दूर केले जात नव्हते. त्यामुळे त्यांची तात्काळ उचलबांगडी केली जावी अशीही ग्रामस्थांची प्रमुख मागणी होती. परंतु याकडे एक्स्चेंजकडून वारंवार दुर्लक्ष होत गेल्यामुळे ग्रामस्थांचा संताप टोकाला गेला. सोमवारी वेतोरे एक्स्चेंजला भेट देण्यासाठी आलेल्या वेंगुर्ले बीएसएनएलचे अधिकारी सी. बी. महाजन हे येथील उपभियंता पी. बी. कुंभार यांच्याशी चर्चा करत असताना ग्रामस्थांनी त्यांना या समस्यांबाबत विचारणा केली. मात्र, समाधानकारक उत्तरे न मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी थेट अधिकार्‍यांना बाहेरुन कार्यालयाला कडी लावून आतच डांबून ठेवले. जोपर्यंत जबाबदार अधिकारी येत नाहीत तोपर्यंत कार्यालय उघडणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला.

यावेळी माजी जि. प. सदस्य समीर नाईक, विश्‍वनाथ गावडे, जि.प. सदस्य सौ. समिधा नाईक, रोहन वराडकर, विवेक गोगटे, सरपंच राधिका गावडे, उपसरपंच यशश्री नाईक  यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक प्रवीण नाईक यांनी घटनास्थळी धाव घेत, ग्रामस्थांना शांत केले. त्यानंतर आत अडकलेल्या बीएसएनएलच्या अधिकार्‍यांशी त्यांनी चर्चा केली. यावेळी ग्रामस्थांची बाजू समजावून घेतली असता, ग्रामस्थांनी अधिकार्‍यांची चांगलीच कानउघडणी केली. येत्या दहा दिवसांत लाईनमन चव्हाण यांची बदली करण्याचे आश्‍वासन अधिकार्‍यांच्या वतीने पोलिस नाईक यांनी दिले. त्यानंतर मोबाईल सेवेबाबत पत्रव्यव्हार करून वेतोरे गावात रेंज नसलेल्या वाड्यांना तात्काळ पाठपुरावा करून ही समस्या सोडवण्यात येईल, असे आश्‍वासन देऊ केले.

यात ग्रामस्थांचे समाधान झाले नाही. अखेरीस सावंतवाडी मोबाईल सेवेचे होन यांच्याशी त्यानंतर जिल्हा प्रबंधक क्षीरसागर यांच्याशी पोलिसांनी चर्चा केली असता पुढील दहा दिवसांत मोबाईल व टेलिफोन सेवेशी संबंधित समस्या सोडवण्यात येतील, असे आश्‍वासन दिल्यानंतर ग्रामस्थानी माघार घेतली. याबाबत वेंगुर्ले पोलिस ठाण्याकडून स्वतः याचा पाठपुरावा केला जाणार असल्याचे पोलिस उपनिरीक्षक नाईक यांनी सांगितले.