होमपेज › Konkan › मराठा समाजाला भाजपच आरक्षण देईल : जगदीश गायकवाड 

मराठा समाजाला भाजपच आरक्षण देईल : जगदीश गायकवाड 

Published On: Aug 02 2018 1:59AM | Last Updated: Aug 01 2018 11:52PMरत्नागिरी : प्रतिनिधी

सध्या मराठा समाजाच्या आरक्षणावरून जोरदार राजकारण केले जात आहे. मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री यापूर्वी झाले. पण त्यांना मराठा समाजाला आरक्षण देता आले नाही. हे आरक्षण भाजपच मिळवून देईल. तसेच यापुढील 25 वर्षे भाजपच सत्तेत राहील, असा विश्‍वास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) कोकण प्रदेशाध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी व्यक्‍त केला.

कोकण प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांशी संवाद साधण्यासाठी बैठकीचे आयोजन रत्नागिरीत करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, रिपब्लिकन पार्टीला आपली ताकत माहित आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत रायगड आणि रत्नागिरीत दोन जागांसाठी मागणी करण्यात येणार आहे. त्यात दापोली मतदार संघाचा समावेश आहे. दापोलीसाठी उमेदवार निवडताना तो मुंबईस्थित असला तरीही त्याचे मूळ दापोली मतदारसंघातील असणे आवश्यक ठेवले आहे. पुढील महिन्यात होणार्‍या मेळाव्यात उमेदवार जाहीर केला जाईल. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना केल्या आहेत.

सध्या भाजपने पुढील 25 वर्षांचे नियोजन केले आहे. त्यांचे शेड्युल ठरलेले आहे. विरोधक फक्‍त आवाज करीत आहेत; मात्र त्यांचे हितचिंतक अधिक आहेत. सामान्य माणूस दुखावलेला नाही. सेना-भाजप विरोधात लढले तर नुकसान होईल. त्यांनी एकत्र लढले पाहीजे. कोकणात सेनेचे वर्चस्व आहे. आरपीआयचीही ताकद मोठी नसली तरीही वाडी-वस्तीवर कार्यकर्ते आहेत. मात्र, हे कार्यकर्ते आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्याचेही ते म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत मधू मोहिते, बाळासाहेब मर्चंडे, प्रितम रुके, तु. गो. सावंत, राजू जाधव आदी उपस्थित होते.

अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टमध्ये बदल नाही

अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टमध्ये कोणताही बदल करता येऊ शकत नाही. सध्या त्याविषयी वावड्या उठवल्या जात आहेत. या कायद्याचा गैरवापर होणार नाही याची काळजी आरपीआयकडून घेतली जात आहे. आरपीआयचा कोणताही कार्यकर्ता खोटी तक्रार करत नाही. रायगडमध्ये हा फंडा यशस्वी केल्याचे गायकवाड यांनी सांगितले.