Tue, Jul 16, 2019 02:07होमपेज › Konkan › भाजप अश्‍वमेधाचे रणशिंग फुंकणार

भाजप अश्‍वमेधाचे रणशिंग फुंकणार

Published On: Jan 14 2018 1:52AM | Last Updated: Jan 13 2018 11:28PM

बुकमार्क करा
चिपळूण : विशेष प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उमेद जागवण्यासाठी बूथ कार्यकर्त्यांचे भव्य संमेलन दि. 15 रोजी आयोजित करण्यात आले आहे. येथील युनायटेड इंग्लिश स्कूलच्या मैदानावर सायंकाळी 6 वा. हे संमेलन होणार आहे. यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून जिल्ह्यात भाजपमय वातावरण बनले आहे. यावेळी ‘कोकणरत्न’ पुरस्कार वितरण सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानीही रसिकांना मिळणार आहे.

राज्यातील आणि केंद्रातील सत्तेच्या माध्यमातून भाजपचा अश्‍वमेध देशभरात यशस्वी होत असताना आगामी काळात कोकणातही हा वारू वेगाने उधळेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यात 2019 मधील राजकीय परिवर्तनाची चाहूल आतापासूनच जाणवू लागली आहे. या परिवर्तनाचे शिल्पकार म्हणून अर्थातच भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्याकडे पाहिले जात आहे. 
मुळात भाजपची स्थापना झाल्यापासून रत्नागिरी जिल्ह्यात पक्षाची किती ताकद आहे याचे गणित मांडलेच गेले नव्हते. उलटपक्षी शिवसेनेशी असलेल्या युतीमुळे भाजपचे गावोगावचे अस्तित्वच पुसून गेले होते. मागील विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवायची वेळ आली तेव्हा हे भीषण सत्य समोर येऊ लागले. 

जिल्ह्यात निवडणुकीदरम्यान एकूण 1664 बूथ लागतात. पण भाजपकडे फक्‍त साडेपाचशे बूथ बसवता येईल एवढीच क्षमता होती. ते लक्षात घेऊन दोन वर्षांपूर्वी  जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणार्‍या बाळ माने यांनी निष्ठावंताच्या सहकार्याने आतापर्यंत ‘न भुतो न भविष्यति’ असे पक्षवाढीचे कार्य उभे केले आहे. 

या कार्यक्रमादरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानीही रसिकांना मिळणार आहे. हा सांस्कृतिक कार्यक्रम प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक उमेश जाधव यांनी साकारला आहे. यामध्ये प्रसिद्ध अभिनेते पुष्कर श्रोत्री, शर्वरी जमेनीस, भार्गवी चिरमुले, सोनाली कुलकर्णी, प्राची शैलेश, मयुरेश पेम, दीपाली सय्यद, प्रथमेश परब आणि स्वप्नील बांदोडकर आणि रोहित राऊत यांच्या अदाकारीचा आस्वाद घ्यायला मिळणार 
आहे. 

एकंदरीत गेल्या काही वर्षांमध्ये बाळ माने यांच्या नेतृत्वाखाली भाजपा जोमाने वाढत असून कार्यकर्त्यांचीही त्याला चांगली साथ लाभत आहे. ग्रामीण भागात चांगली फळी निर्माण होऊ लागली आहे. भाजपच्या जिल्ह्यातील पहिल्याच अभूतपूर्व सोहळ्याची तयारी पाहून सर्वांच्याच भुवया उंचावणार आहेत. या उपक्रमामुळे भाजपमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण होणार आहे.