Mon, Jul 06, 2020 11:35होमपेज › Konkan › भाजपने राणे यांना त्यांची जागा दाखवली : ना. दीपक केसरकर

भाजपने राणे यांना त्यांची जागा दाखवली : ना. दीपक केसरकर

Published On: Dec 02 2017 12:39AM | Last Updated: Dec 01 2017 11:07PM

बुकमार्क करा

सावंतवाडी : प्रतिनिधी

सध्या नारायण राणे यांना मंत्रिपदाची स्वप्ने पडत आहेत. मात्र, काही झाले तरी शिवसेनेचा एकही आमदार त्यांच्या पाठीशी राहणार नाही. किंबहुना काँग्रेसने व्हीप बजावला की त्यांचा मुलगा आ. नितेश राणे हे सुध्दा त्यांना मत  देऊ शकणार  नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मागच्या दाराने येण्याचे राणेंचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. भाजपने राणे यांना त्यांची जागा दाखवली आहे, अशी टीका शिवसेनेचे नेते, सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी राणे यांच्यावर केली.

सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, माजी पं.स.सदस्य नारायण उर्फ बबन राणे, कामगारसेना तालुकाध्यक्ष चंद्रकांत कासार आदी उपस्थित होते.

नारायण राणे यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर  रिक्‍त झालेल्या विधानपरिषदेच्या आमदारकीच्या जागेसाठी साधे तिकीटही राणे यांना मिळू शकले नाही. मागच्या दाराने कितीही येण्याचा प्रयत्न केला तरी राणेंना जनतेला उत्तर द्यावे लागेल. जनतेच्या न्यायालयात त्यांना सर्व प्रश्‍नांची उत्तरे द्यावी लागतील.  शिवसेना-भाजपाचे उमेदवार प्रसाद लाड हे निश्‍चित निवडून येतील. बिनविरोध मतदान प्रक्रिया होण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. खरे तर काँग्रेसने ही निवडणूक बिनविरोध करायला हवी होती. कोणाच्या किती जागा आहेत हे प्रत्येक पक्षाला माहित असल्याने मतदान करून वेळ वाया घालवू नये, असे ते म्हणाले.

वृत्तपत्राचे स्वातंत्र्य हिरावून घेवू नये

वृत्तपत्रावर खटले टाकण्याची धमकी देवून राणे विचार स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु त्यांच्यावर असलेल्या खटल्याची यादी माझ्याकडे आहे. आवश्यक असल्यास ती नक्कीच जाहीर करेन, असा इशारा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी देवून वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य कुणी हिरावून घेवू नये, असे सांगितले.