Sat, Dec 14, 2019 02:38होमपेज › Konkan › भाजपची खासदार राऊतविरोधी धार तीव्र!

भाजपची खासदार राऊतविरोधी धार तीव्र!

Published On: Feb 14 2019 1:34AM | Last Updated: Feb 14 2019 1:34AM
कणकवली : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या तारखा येत्या काही दिवसात जाहीर होण्याची घटिका समीप आली असतानाच सिंधुदुर्गात मात्र लोकसभेला भाजपने केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनाच उमेदवारी द्यावी. शिवसेनेचे खा. विनायक राऊत यांनी गेल्या 5 वर्षात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सातत्याने दुर्लक्षित केले. त्यामुळे खा. राऊत यांच्यासह अन्य कोणत्याही पक्षाचा उमेदवार लादल्यास कार्यकर्ते कोणत्याही परिस्थितीत त्यांचा प्रचार करणार नाहीत, असा निर्धार कणकवली तालुक्यातील भाजपा पदाधिकार्‍यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना केला. 

कणकवलीतील भाजप संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष राजश्री धुमाळे, राजन चिके, कणकवली तालुकाध्यक्ष संदेश पटेल, भाजपा माजी तालुकाध्यक्ष शिशीर परूळेकर, भाजपा सरपंच आघाडी जिल्हाध्यक्ष रमेश पावसकर, परशुराम झगडे, तालुका सरचिटणीस बबलू सावंत, पप्पू पुजारे, प्रदीप गावडे, समर्थ राणे आदी उपस्थित होते. 

राजश्री धुमाळे म्हणाल्या, मोदी लाटेत खा. विनायक राऊत हे विजयी  झाले. त्यांचा प्रचार भाजप पदाधिकार्‍यांनी केला. मात्र निवडणूकीच्या वेळी खा. विनायक राऊत यांनी भाजपला दिलेली आश्‍वासने पाळलेली नाहीत. कणकवली रेल्वे स्थानकाचे सुशोभिकरण, बांधकरवाडी अंडरपासचे काम केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्यामुळेच झाले. मात्र अंडरपासच्या शुभारंभप्रसंगी खा. विनायक राऊत यांना भाजपचा विसर पडला. 

विकासकामांसाठी गेल्या पाच वर्षात त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना निधी दिलेला नाही. त्यामुळे आम्हाला भाजपचा हक्‍काचा खासदार हवा आहे. आम्ही आमची नाराजी कळवूनही खा. राऊत यांनी दखल घेतलेली नाही. त्यामुळे राऊत नको प्रभूच हवेत अशी आमची मागणी आहे. या मागणीला सिंधुदुर्गबरोबरच रत्नागिरी जिल्ह्यातही चांगला प्रतिसाद मिळत आहे. जनतेलाही सुरेश प्रभूच खासदार म्हणून हवे आहेत असे सौ. धुमाळे म्हणाल्या. 

राजन चिके म्हणाले, सुरेश प्रभू लोकसभेत निवडून गेल्यानंर मंत्री होतील, पण इतर कोणतीही व्यक्‍ती निवडून गेली तर ती फक्‍त खासदारच होणार आहे. त्यामुळे विकास खुंटणार आहे. त्यासाठी आम्ही सर्वांनुमते सुरेश प्रभूंनाच उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. 

संदेश पटेल म्हणाले, सिंधुदुर्गात शिवसेनेने नेहमीच भाजपला फसविले आहे, त्यामुळे कोअर कमिटीकडे आम्ही सुरेश प्रभूंच्या उमेदवारीचा आग्रह धरला आहे. 

परशुराम झगडे म्हणाले, ज्यांनी विनायक राऊत यांचा प्रचार केला त्या भाजप कार्यकर्त्यांशी खा. राऊत यांचा संपर्क नसल्याने ते आता त्यांना ओळखूही शकणार नाहीत. भाजपशी समन्वय ठेवण्यात खा. राऊत असफल ठरले आहेत. यावेळी रमेश पावसकर, बबलू सावंत यांनीही आपली मते मांडली. यामुळे शिवसेना व भाजपकार्यकर्त्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा ज्वर वाढणार आहे.