Sat, Feb 16, 2019 07:01होमपेज › Konkan › भाजपकडून निरंजन डावखरेंचा उमेदवारी अर्ज दाखल

भाजपकडून निरंजन डावखरेंचा उमेदवारी अर्ज दाखल

Published On: Jun 08 2018 1:22AM | Last Updated: Jun 07 2018 10:26PMरत्नागिरी : शहर वार्ताहर

कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप-रिपब्लिकन पक्षाच्या आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांनी विभागीय आयुक्तांच्या कोकण भवन येथील कार्यालयात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. 

यावेळी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याबरोबरच खा. कपिल पाटील, आ. संजय केळकर, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, माजी खा. रामशेठ ठाकूर, माजी आ. रामनाथ मोते आदी नेत्यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. 

कोकण पदवीधर मतदारसंघ हा पूर्वीपासून भाजपचा बालेकिल्ला आहे. गेल्या सहा वर्षांपासून मतदारसंघात अ‍ॅड. निरंजन डावखरे यांनी संपर्क ठेवला असून, विविध विकासकामे केली आहेत. त्यांचा विविध संस्थांबरोबर संबंध आला आहे. त्याचबरोबर शिक्षक परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून आम्ही पदवीधर मतदारांपर्यंत पोचत आहोत. त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः अ‍ॅड. डावखरे यांच्याबद्दल मतदारांमध्ये विश्‍वास आहे. त्यामुळे ते बहुमताने जिंकून येतील, असा विश्‍वास अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. 

गेल्या सहा वर्षांत शिक्षक, पदवीधर, कृषी पदवीधरांबरोबरच समाजातील विविध घटकांचे प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यातील अनेक प्रश्‍न मार्गी लागले आहेत. सहा वर्षांत केलेली कामे मतदारांसमोर ठेवून संवाद साधत आहोत, अशी माहिती अ‍ॅड. निरंजन डावखरे यांनी पत्रकारांना दिली.