Sat, Jul 20, 2019 15:40होमपेज › Konkan › भाजपच शिवसेनेचा प्रमुख शत्रू

भाजपच शिवसेनेचा प्रमुख शत्रू

Published On: Mar 18 2018 1:07AM | Last Updated: Mar 17 2018 10:20PMचिपळूण : खास प्रतिनिधी

जर भाजप ‘शत प्रतिशत’च्या घोषणा करीत असेल, तर शिवसेनाही यापुढे राज्यात स्वबळावर निवडणूक लढविणार आहे. याचा निर्धार करण्यासाठी कोकणातून प्रारंभ होत आहे. जनतेचा ‘नाणार’ला विरोध असेल, तर शिवसेनाही जनतेबरोबरच आहे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे कोकणातील सर्वच्या सर्व जागा जिंकत गुहागर आणि दापोलीत भगवा फडकावणारच, या निर्धारासह भाजपच शिवसेनेचा प्रमुख शत्रू आहे, असा सूर तालुक्यातील घोणसरे येथे झालेल्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात शिवसेना नेत्यांनी व्यक्‍त केला.

गुहागर मतदारसंघातील सेना कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा शनिवारी दुपारी घोणसरे येथे झाला. यावेळी 2009 नंतर प्रथमच गुहागर मतदारसंघात केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते व पर्यावरणमंत्री रामदास कदम हे एकाच व्यासपीठावर आले. यावेळी त्यांच्यासमवेत उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री रवींद्र वायकर, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम, राजेंद्र महाडिक, संपर्कप्रमुख विजय कदम, आ. सदानंद चव्हाण, जि.प. अध्यक्षा स्नेहा सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. 

या मेळाव्यात शिवसेना नेत्यांनी भाजपवर तोंडसुख घेत स्वबळाचा नारा दिला, तर उद्योगमंत्री देसाई, पर्यावरणमंत्री कदम यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली. ना. गीते म्हणाले की, दापोली व गुहागरमध्ये शिवसेना विजय मिळविणारच, हा या मेळाव्याचा निर्धार आहे. ‘एनडीए’त महाराष्ट्रातील चाळीस खासदार असून, अठरा सेनेचे असून, वीस खासदार भाजपचे आहेत. त्यामुळे आम्हीही स्वबळाचाच नारा दिला आहे. यापुढे रायगड लोकसभेवर सेनेचाच भगवा फडकेल, असे ना. कदम यांच्याकडे पाहत त्यांनी सांगितले. हिंमत असेल तर आ. सुनील तटकरे यांनी आपल्यासमोर उभे राहून दाखवावे. तटकरेच काय, जयंत पाटीलसुद्धा आपल्यासमोर लढणार नाहीत, असे स्पष्ट केले व गुहागर जिंकल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असे सांगितले.

अंदर की बात...

गुहागर विधानसभा मतदारसंघातील घोणसरे येथे शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात सेनेचे चार मंत्री उपस्थित होते. परंतु, एकाही मंत्र्याने येथील विद्यमान आमदारांवर टीकेची झोड उठवली नाही. केवळ आम्ही गुहागर विधानसभेवर भगवा फडकावणारच, एवढा निर्धार व्यक्‍त केला. पर्यावरणमंत्री कदम यांनी तर गेल्या निवडणुकीत आपण भास्कर जाधवांमुळे पराभूत झालो नाही, तर आपल्याला विनय नातू यांनी पाडले. एकेकाळचा आमच्यातीलच रात्री पैसे घेऊन आला आणि नातूंना उभे केले. मात्र, आता ‘अंदर की बात है, भास्कर हमारे साथ है’ असे वक्‍तव्य करीत या निर्धार मेळाव्यात संभ्रम निर्माण केला, तर भाजप हाच शिवसेनेचा शत्रू आहे, असे स्पष्ट केले.

URL : BJP, main, enemy, Shivsena, konkan news