Tue, Apr 23, 2019 19:34होमपेज › Konkan › लोकसभा निवडणुकीसाठी भाजपही स्वबळावर : प्रसाद लाड

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपही स्वबळावर : प्रसाद लाड

Published On: Aug 30 2018 1:19AM | Last Updated: Aug 29 2018 10:30PMकणकवली : प्रतिनिधी

जर सर्वच स्वबळाची भाषा करत असतील तर 2019 मध्ये होवू घातलेली लोकसभा आणि विधानसभा निवडणुक भाजप देखील स्वबळावरच लढविणार आहे. त्यादृष्टीने आमची रणनिती ठरलेली आहे. उमेदवार कोण हे भाजपची केंद्रीय आणि राज्यस्तरीय समिती निश्‍चित ठरवेल. यापूर्वी युतीमुळे कोकणात भाजप मजबूत होवू शकला नाही, मात्र आता आम्ही पक्ष वाढविण्यासाठी जोमाने तयारी सुरु केली आहे. जिल्हयात भाजपची ताकद वाढत असून आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर सिंधुदुर्गात पदाधिकारीनिहाय जबाबदारी निश्‍चित केली आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे प्रभारी आ. प्रसाद लाड यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीची सिंधुदुर्गातील रणनिती ठरविण्यासाठी भाजपच्या जिल्हा आणि विस्तारीत कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक बुधवारी सायंकाळी येथील मातोश्री मंगल कार्यालयात झाली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आ.प्रसाद लाड उपस्थित होते. या बैठकीला भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजप नेते संदेश पारकर, प्रदेश चिटणीस राजन तेली, महिला जिल्हाध्यक्षा सौ.स्नेहा कुबल, सावंतवाडीच्या उपनगराध्यक्षा सौ.अन्नपूर्णा कोरगांवकर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, राजू राऊळ, सर्व तालुक्यांचे तालुकाध्यक्ष, जिल्हा व तालुका कार्यकारिणी पदाधिकारी उपस्थित होते.या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत आ.प्रसाद लाड यांनी माहिती दिली. ते म्हणाले, आजच्या बैठकीत लोकसभा निवडणूक पार्श्‍वभूमीवर रणनिती ठरवत पदाधिकार्‍यांवर जबाबदारी निश्‍चित करण्यात आली.

पक्ष संघटना कशी बळकट करता येईल, केंद्र व राज्य सरकारच्या योजना लाभार्थ्यांपर्यत कितपत पोहोचल्या, नवीन मतदार नोंदणी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, बुथनिहाय कार्यकर्त्यांची जबाबदारी अशा विविध मुद्दयावर विस्तृत चर्चा करण्यात आली. भाजपच्यावतीने आठही तालुक्यामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु केले जाणार आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ ग्रामीण जनतेपर्यंत कितपत पोहोचला, जे लाभार्थी अद्यापही वंचित आहेत त्यांना या योजनांचा लाभ मिळवून देणे, याबाबतही चर्चा करण्यात आली. तसेच विकासनिधीच्या नियोजनाबाबतही चर्चा झाली. पक्ष बळकटीसाठी  पदाधिकारी निहाय जबाबदारी निश्‍चित झाली. त्यामध्ये लोकसभा मतदारसंघ प्रभारी म्हणून आ.प्रसाद लाड, जिल्हा संयोजक - प्रमोद जठार, सोशल मिडिया-प्रभाकर सावंत, प्रसिद्धी प्रमुख-निलेश तेंडूलकर, लाभार्थी संपर्क -अनिल सावंत, रश्मी लुडबे, लिगल सेल-सिद्धार्थ भांबुरे, विधानसभा प्रभारीपदी कणकवली-संदेश पारकर, कुडाळ-मालवण-अतुल काळसेकर, सावंतवाडी- राजन तेली, मतदार नोंदणीप्रमुख -अतुल रावराणे, तालुका प्रभारी देवगड-जयदेव कदम, वैभववाडी-प्रमोद रावराणे, कणकवली - राजन चिके, कुडाळ- राजू राऊळ, मालवण-विलास हडकर, वेंगुर्ला- यशवंत आठलेकर, सावंतवाडी- शामकात काणेकर, दोडामार्ग-राजेंद्र म्हापसेकर, भाजपा अल्पसंख्याक आघाडी संयोजक-लॉरेन्स मान्येकर, सह संयोजक -अब्दुलगनी मुजावर यांची नियुक्‍त केल्याची आ.लाड यांनी सांगितले. 

ते म्हणाले, जिल्हयात भाजपचे 74 सरपंच, 64 उपसरपंच, 908 ग्रा.पं.सदस्य आहेत. या सर्वांना पक्ष संघटना बळकटीसाठी प्रोत्साहित करण्यात आले आहे. जिल्हयात भाजपची ताकद वाढली असून आगामी निवडणुकीत आम्हाला चांगले यश मिळेल, असे त्यांनी सांगितले. लोकसभेसाठी या मतदारसंघातून केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे नाव निश्‍चित झाले आहे, असा प्रश्‍न विचारला असता आ.लाड हे म्हणाले, उमेदवार कोण असेल हे केंद्रीय समिती निश्‍चित करणार आहे. जर ना.प्रभू यांचे नाव निश्‍चित झाले तर भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते एकदिलाने त्यांच्या विजयासाठी काम करतील. नारायण राणे हे एनडीएचे घटक पक्ष आहेत. त्यांच्या आणि आमच्या अटी मान्य झाल्या तर युतीबाबतही विचार होवू शकतो, असेही आ.लाड पत्रकारांच्या प्रश्‍नावर उत्‍तर देताना म्हणाले.

काका कुडाळकर यांच्या नाराजीबाबत बोलताना ते म्हणाले, काका कुडाळकर पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याशी चर्चा करून त्यांची नाराजी दूर केली जाईल. आपल्या स्तरावर ती दूर न झाल्यास प्रदेश स्तरावर त्यांची चर्चा घडवून आणली जाईल. मात्र ते भाजपमध्येच आहेत आणि राहतील असा विश्‍वास आ.लाड यांनी केला. भाजपच्या या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सिंधुदुर्गातील आठही तालुक्यांसाठी आ.प्रसाद लाड यांच्या आमदार निधीतून 10 कोटीचा विकास निधी दिला जाईल, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी दिली.