Sat, Dec 14, 2019 02:51होमपेज › Konkan › युतीमुळे वाढणार सेनेचे बळ; भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांना सेना नेते गोंजारणार

युतीमुळे वाढणार सेनेचे बळ; भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांना सेना नेते गोंजारणार

Published On: Feb 20 2019 1:35AM | Last Updated: Feb 19 2019 11:09PM
रत्नागिरी : प्रतिनिधी

आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीनंतर शिवसेना-भाजपच्या युतीचे घोडे अखेर गंगेत न्हाले. रत्नागिरी जिल्हा दोन लोकसभा मतदारसंघांत विभागला गेला आहे. दक्षिण रत्नागिरीतील तीन विधानसभा मतदारसंघ हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात असून, त्यावर सेनेचे वर्चस्व आहे तर उत्तर  रत्नागिरीतील दोन विधानसभा मतदारसंघ हे रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये जोडले गेले असून, त्यावर राष्ट्रवादीचा झेंडा असला तरी सेनेने या भागात जोरदार लढतीची तयारी केली आहे. त्यामुळे  रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेवर सेनेचा वारू चौफेर उधळण्यासाठी सज्ज झाला असला तरी रायगड मतदारसंघात गुहागर व खेड-दापोली विधानसभेत सेना किती आघाडी घेते यावर सेनेचे नेते अनंत गीते यांचे भवितव्य ठरणार आहे. सध्या तरी जिल्ह्यात कागदावरील आकडेवारीत सेनेचे वर्चस्व दिसून येत आहे.

गत लोकसभेला सेना-भाजप युती झाली. मात्र, विधानसभेला युती तुटल्यानंतर सत्तेत येण्यासाठी दोघांनीही गळ्यातगळे गुंफले. पण गेली साडेचार वर्षे युतीमध्ये बसूनही सेना-भाजपचे पटले नाही. त्याचा प्रभाव थेट ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांवरही पडला आहे. जिल्ह्यात लांजा-राजापूर, रत्नागिरी व संगमेश्‍वर-चिपळूण मतदारसंघावर सेनेचे आमदार आहेत. या आमदारांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना कधीही विश्‍वासात घेतले नाही की, जवळ केले नाही. रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या खासदारांनीही अशाच पद्धतीने भाजपच्या पदाधिकार्‍यांना विश्‍वासात घेतले नाही. त्यामुळे युतीपूर्वी  रत्नागिरी-सिंधुदुर्गतील भाजपच्या पदाधिकार्‍यांनी  उमेदवार उभा करण्याची परवानगी द्यावी, अशी भूमिका अमित शहा यांच्याकडे व्यक्‍त केली होती. 

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्यात सेनेचे तीन आमदार असल्याने कागदावर तरी सेनेचे वर्चस्व दिसून येत आहे. गत लोकसभेला मोदी लाटेमुळे मिळालेले मताधिक्य यावेळी सेना टिकवणार की मताधिक्य कमी होणार, हेही स्पष्ट होणार आहे. माजी खासदार नीलेश राणे हे काँग्रेसकडून मैदानात होते. त्यावेळी त्यांना राष्ट्रवादीची साथ मिळाली होती. यावेळी नीलेश राणे ‘स्वाभिमान’तर्फे रिंगणात उतरणार असून, काँग्रेसनेही आपला उमेदवार उतरवण्याची तयारी केली आहे. त्यामुळे राणे व काँग्रेसच्या मतांमध्ये विभागणी होणार आहे. त्याचाही फायदा विनायक राऊत यांना मिळणार आहे. त्यामुळे सध्यातरी सेनेचे वर्चस्व तीन विधानसभा मतदारसंघामध्ये दिसून येत आहे.

युतीच्या घोषणेबरोबरच नाणार रद्दची घोषणा झाल्याने त्याचा फायदा राजापूर मतदारसंघात सेनेला होणार आहे. मात्र, आमदार राजन साळवी यांनी प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने नेटाने लढा दिला. या प्रकल्पांतर्गत येणारी 14 गावांतील जनता सेनेपासून काहीसी दूर होत होती. प्रकल्प हलवण्याच्या निर्णयामुळे सेनेला या भागावर वर्चस्व राखता येणार आहे. रत्नागिरी विधानसभेत ‘म्हाडा’ अध्यक्ष उदय सामंत यांचे एकहाती वर्चस्व असून,  गतवेळी ते राष्ट्रवादीत असतानाही सेनेने या मतदारसंघात पंधरा हजारांचे मताधिक्य खा. राऊत यांना मिळवून दिले होते तर आ. सामंत सेनेत आल्यावर ते 40 हजारांच्या मताधिक्क्यांनी विजयी झाले होते. त्यामुळे या लोकसभेला किती मताधिक्य वाढवून देतात, याकडे लक्ष राहणार आहे. चिपळूण-संगमेश्‍वर मतदारसंघात गतवेळी 25 हजारांचे मताधिक्य खा. राऊत यांना मिळाले होते. परंतु, विधानसभेला आ. सदानंद चव्हाण अवघ्या सहा हजार मतांनी विजयी झाले होते. त्यानंतर झालेल्या चिपळूण व देवरुख नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांनी थेट नगराध्यक्षपदावर बाजी मारली होती.

युती झाल्याने कागदावरील आकडेवारीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात सेना-भाजप सहज विजयी होईल, असे चित्र असले तरी भाजपचे कार्यकर्ते कोणती भूमिका घेतात, ‘स्वाभिमान’चे नेते नारायण राणे हे पुत्र नीलेश राणे यांच्यासाठी काय जादू करतात, हेही पहावे लागणार आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्गप्रमाणेच रत्नागिरी-रायगड लोकसभा मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्यातील चार तालुके व दोन विधानसभा मतदारसंघ येतात.  सध्या गुहागर-चिपळूण मतदारसंघावर राष्ट्रवादीचे भास्कर जाधव तर खेड-दापोली-मंडणगड मतदारसंघावर राष्ट्रवादीचे संजय कदम आमदार आहेत. गुहागर हा भाजपचा बालेकिल्‍ला म्हणून ओळखला जात होता.  मात्र, सेना-भाजप मतविभागणीमुळे तो राष्ट्रवादीच्या ताब्यात गेला. त्याचे शल्य आजही भाजपच्या कार्यकर्त्यांना असल्याचे दिसून येते. खेड-दापोलीवर सेनेचे वर्चस्व होते. मात्र, सेनेच्या अंतर्गत कलहामुळे हा मतदारसंघ गतवेळी राष्ट्रवादीच्या ताब्यात गेला व पाचवेळा आमदार झालेले सेनेचे ज्येष्ठ आमदार सूर्यकांत दळवी पराभूत झाले होते. सध्या पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आपले पुत्र योगेश कदम यांच्यासाठी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला असून, मोठ्या प्रमाणात विकासकामे केल्याने, सेनेला या मतदारसंघावर भगवा फडकवण्याची आशा दिसू लागली आहे. मात्र, दळवी-कदम वादाचा फटका लोकसभेला बसू शकतो.

दोन्ही मतदारसंघांत सेनेला जिल्ह्यात मोठे मताधिक्य मिळेल अशी सद्य:स्थिती आहे. गेल्या चार-साडेचार वर्षांतील कटू प्रसंग टाळून युतीचे कार्यकर्ते लोकसभेसाठी तयार होणार आहेत. मात्र, भाजप कार्यकर्त्यांची अंतिम क्षणी भूमिका काय असेल हेही मताधिक्क्यावर परिणाम करणारे ठरणार आहे.

युतीच्या घोषणेमुळे बंडोबांच्या तलवारी म्यान

युतीच्या घोषणेनंतर या सर्व पदाधिकार्‍यांनी आपल्या बंडाच्या तलवारी म्यान केल्या असल्या तरी ते सेनेचे काम मनापासून करतील का? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. भाजपची दीड लाख मते असून तेवढेच मताधिक्य  मागील निवडणुकीत विनायक राऊत यांना मिळाले होते.