Sun, Jul 21, 2019 05:34होमपेज › Konkan › राणे यांच्या आरोपांवर लोकांचा विश्‍वास नाही : संदेश पारकर

राणे यांच्या आरोपांवर लोकांचा विश्‍वास नाही : संदेश पारकर

Published On: Apr 05 2018 11:19PM | Last Updated: Apr 05 2018 11:15PMकणकवली : प्रतिनिधी

माझ्यावर  कृतघ्नतेचा आरोप करताना नारायण राणे यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावे. ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मुख्यमंत्रीपद दिले त्या शिवसेनेशी, तसेच  तीनवेळा पराभूत होऊनही  काँग्रेसने विधान परिषदेची आमदारकी दिली त्या काँग्रेसशी ते कसे वागले हे सर्वांनाच ज्ञात आहे. राणे यांनी कितीही गलिच्छ आरोप केले तरीही कणकवलीकर जनतेचा माझ्यावर विश्‍वास आहे, असे उद‍्गार संदेश पारकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना काढले.

यावेळी भाजपचे प्रवक्‍ते मधु चव्हाण, जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, प्रदेश चिटणीस राजन तेली, अतुल रावराणे, रवींद्र शेट्ये, बबलू सावंत यावेळी उपस्थित होते. संदेश पारकर म्हणाले, माझे कणकवलीशी अतूट नाते असून ते गेली अनेक वर्षे चांगल्या पध्दतीने निभावले आहे. सांस्कृतिक, कला, क्रीडा, साहित्य क्षेत्रात मी सातत्याने काम करत आहे.  त्यामुळे कणकवलीतील जनतेचा माझ्यावर पूर्णपणे विश्‍वास आहे. राणे यांनी माझ्यावर केलेल्या आरोपांवर जनता कदापि विश्‍वास ठेवणार नाही. हे आरोप त्यांनी आत्ताच केले नाहीत तर यापूर्वीही अनेकदा केले आहेत. राणे यांनी ज्या पध्दतीने माझ्यावर आरोप करताना जे शब्द वापरले ते कणकवलीतील जनतेला आवडलेले नाहीत, असेही पारकर म्हणाले. 

ते पुढे म्हणाले,  राणे अनेक वर्षे मंत्री होते. महाराष्ट्रातील अन्य नेत्यांनी आपआपल्या गावाचा विकास केला. मात्र राणे आपल्या वरवडे गावाचा विकास का करू शकले नाहीत? मग ते कणकवली शहराचा विकास काय करणार? असा सवाल पारकर यांनी केला. मी अपशकुनी असेल तर नितेश राणे आमदार म्हणून कसे निवडून आले? माझ्यामुळेच ते आमदार झाले हे लक्षात ठेवावे असेही ते म्हणाले. 

संसदेत गेलेल्या नेत्यांना असंसदीय भाषा शोभत नाही : प्रमोद जठार 
 

भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार म्हणाले, कालच्या जाहीर सभेत नारायण राणे यांनी केलेले आरोप पाहता संसदेत गेलेल्या नेत्याच्या तोंडात अशी असंसदीय भाषा शोभत नाही. ज्या पक्षाने नाणार रिफायनरी प्रकल्पाचा चंग बांधला आहे, त्या पक्षाच्या कोट्यातील खासदारकी नारायण राणे यांनी कोणत्या हक्‍काने स्वीकारली याचे उत्तर जनतेला द्यावे, असे आव्हान प्रमोद जठार यांनी दिले. राजन तेली म्हणाले,  राणे विकासाबद्दल काहीच बोलले नाहीत. त्यांनी कितीही घोषणा केल्या तरीही मुख्यमंत्रीच विकासाला निधी देणार आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असे ते म्हणाले. अतुल रावराणे यांनीही राणेेंच्या आरोपांना उत्तर दिले.
 

Tags : BJP, MP, Narayan Rane,  Sandesh Parkar, Kankavli