Fri, Jul 19, 2019 01:06होमपेज › Konkan › सिंधुदुर्गात अद्ययावत रुग्णालय उभारणार

सिंधुदुर्गात अद्ययावत रुग्णालय उभारणार

Published On: Apr 08 2018 2:12AM | Last Updated: Apr 08 2018 1:50AMओरोस : प्रतिनिधी

गरीब जनतेला आरोग्य सुविधा देणे हे आम्हा लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. त्यादृष्टीने येत्या 15 ऑगस्टपासून जिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन मशीन सुरू करू, यावर न थांबता गोव्यावर अवलंबून राहणार्‍या सिंधुदुर्गातील जनतेच्या आरोग्य सुविधेसाठी जवाहर नेहरू पोर्टच्या माध्यमातून अद्ययावत रुग्णालय व कॅन्सर रूग्णालय आणण्याचा प्रयत्न करू,असा विश्‍वास जवाहर नेहरू पोर्टचे विश्‍वस्त आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी जागतिक आरोग्य दिन कार्यक्रमात केला.

जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गनगरी येथे जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून जवाहर नेहरू पोर्ट ट्रस्ट जिल्हा रूग्णालय सिंधुदुर्गनगरी सिंधुभूमी रूग्ण सेवा समितीच्या माध्यमातून धनादेश सुपूर्द व आरोग्य दिन पार पडला. या निमित्ताने जवाहर नेहरू पोर्टच्या माध्यमातून दिड कोटी रूपये खर्च करून देण्यात येणार्‍या सिटीस्कॅन जागेची व अन्य सुविधांची पाहणी करण्यात आली.जवाहर नेहरू पोर्ट ट्रस्टचे विश्‍वस्त प्रमोद जठार, मुख्य व्यवस्थापक जे.बी.ढवळे, मॅनेजर एन.के.कुळकर्णी, डॉ.राज राणे, जे.बी.मोरे, श्री.हिंगोली, बबलू सावंत, जिल्हा चिकित्सक एस.व्ही.कुळकर्णी, डॉ.बोरकर, पि.डी.धाकोडे,भगिरथ प्रतिष्ठानचे प्रसाद देवधर यांसह आरोग्य सेविका,रुग्णालय कर्मचारी उपस्थित होते. 

प्रमोद जठार म्हणाले, सिंधुदुर्गातील गरीब जनतेच्या आरोग्याच्या सुविधा  सेवा पुरविण्याच्या दृष्टीने जवाहर नेहरू पोर्टच्या माध्यमातून दीड कोटी रूपये खर्च करून सिटी स्कॅन मशीन देण्यात येणार आहे. जवाहर नेहरू पोर्ट आरोग्य जलयुक्त शिवार रस्ते व अन्य उपक्रम राबविले. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, चेअरमन निरंजन बनसाळे याचे मोलाचे सहकार्य आहे. दीड कोटीवर न थांबता गोव्यावर अवलंबून रहाव्या लागणार्‍या सिंधुदुर्गातील जनतेला अद्ययावत सेवा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जठार यांनी सांगितले.
आमचे शासन असले तरी रुग्णसेवा परमेश्‍वर सेवा समजून काम करणार. याशिवाय लवकरच जे.एन.पी.टीच्या माध्यमातून अद्ययावत रूग्णालय सुविधा आणि कॅन्सर रूग्णालय उभारण्यासाठी आपले प्रयत्न सुरु असून विजयदुर्ग येथे दुसरी जे.एन.पी.टी.सी.पोर्ट करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे जठार यांनी जाहीर केले. जवाहरलाल नेहरू पोर्टचे मॅनेजर कुळकर्णी म्हणाले,जिल्हा रुग्णालयात सिटी स्कॅनची सुविधा पुरविण्याच्या प्रस्तावाला केंद्रशासनाची मान्यता मिळाली असून लवकरच सिटी स्कॅनची मशीन उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे. जलयुक्त शिवार, आरोग्य सुविधा यासारख्या विविध सामाजिक उप्रक्रम जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट राबविताना आरोग्य सेवा ही महत्त्वाची  सेवा समजून गरिबांची सेवा केली जात असल्याचे ते म्हणाले.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एस.व्ही.कुळकर्णी म्हणाले, जिल्हयात 1998 ते 2011 पर्यंत सुरु असलेली सिटी स्कॅन मशीन बंद पडल्यानंतर शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता व त्यानंतर आतापर्यंत खासगी सिटी स्कॅन माध्यमातून  22 लाख निधी खर्च केला. माजी आ.प्रमोद जठार यांच्या माध्यमातून दिलेले योगदान आज आरोग्य दिनाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण आहे व पहिले सिटी स्कॅन मशीन 15 ऑगस्टपासून सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

 

Tags : sindhudurg district arora, BJP District President Pramod Jathar