होमपेज › Konkan › काळे झेंडे दाखवून जठारांना अडविले!

काळे झेंडे दाखवून जठारांना अडविले!

Published On: Aug 19 2018 1:31AM | Last Updated: Aug 18 2018 11:10PMदेवगड : प्रतिनिधी

विजयदुर्ग येथे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या कार्यक्रमाला जाणार्‍या भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांना गिर्ये रामेश्‍वर येथील रिफायनरी प्रकल्प विरोधकांच्या संतापाला सामोरे जावे लागले. प्रकल्पाचे समर्थन करणार्‍या प्रमोद जठार यांना गिर्ये रामेश्‍वर येथील प्रकल्पविरोधी स्थानिकांनी काळे झेंडे दाखवून निदर्शने केली. गिर्ये कॅन्टीन येथे त्यांना अडविण्याचा प्रयत्न पोलिसांमुळे अशक्य झाला. मात्र रामेश्‍वर काटे येथे सुमारे पाचशेहून रिफायनरी विरोधक ग्रामस्थांनी जठार व त्यांच्या सहकार्‍यांचा गाड्या अडवून एक तास निदर्शने व घोषणाबाजी केली.रिफायनरी विरोधकांच्या तीव्र भावना लक्षात घेवून प्रमोद जठार यांना आपल्या सहकार्‍यांसह अखेर माघारी परतावे लागले. 

रिफायनरी विरोधात स्थानिकांच्या भावना मुख्यमंत्र्यांसमोर मांडून लवकरात लवकर याबाबत बैठक आयोजित करण्याचे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले. नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांना हेलिअम डे दिवशी काळे झेंडे दाखवून रिफायनरीचा निषेध करण्याचा निर्णय संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार गिर्ये व रामेश्‍वर या दोन्ही गावांतील स्थानिक गिर्ये कॅन्टीन व रामेश्‍वर काटे येथे शनिवारी सकाळी 10 वा.पासून काळे झेंड्यासहीत दाखल झाले होते. यामध्ये महिलावर्गाचाही  सहभाग होता. प्रकल्पविरोधी स्थानिक ग्रामस्थ काळे झेंडे दाखवून निदर्शने करणार असल्यामुळे याठिकाणी पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता.

देवगड येथील श्रध्दांजली सभा आटोपल्यानंतर विजयदुर्ग येथे कार्यक्रमासाठी जात असताना गिर्ये कॅन्टीन येथे स्थानिकांनी प्रमोद जठार यांना काळे झेंडे दाखवून त्यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी अटकाव केल्यामुळे शक्य झाले नाही. मात्र, रामेश्‍वर-काटे येथे प्रमोद जठार यांना मोठ्या संख्येने असलेल्या स्थानिकांच्या संतापाला सामोरे जावे लागले. 500 हून अधिक ग्रामस्थांनी काळे झेंडे दाखवून जठार यांच्यासमोर निदर्शने केली. ‘रिफायनरी हटाव कोकण बचाव, जमीन आमच्या हक्‍काची नाही, कोणाच्या बापाची’ व प्रमोद जठार यांच्याविरोधात  घोषणाबाजी करून रिफायनरीविरोधात तीव्र संताप व्यक्‍त केला. संतप्त ग्रामस्थांनी प्रमोद जठार यांना विजयदुर्ग येथे जावू देणार नाही, असा पवित्रा घेतला. यावेळी प्रमोद जठार यांच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना पोलिसांनी कडे केले. मात्र संतप्‍त ग्रामस्थांनी प्रमोद जठार यांनी गाडीतून खाली उतरून लोकांशी संवाद साधावा, अशी मागणी केली. रामेश्‍वर संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश केळकर, नासिर मुकादम, विजयदुर्ग सरपंच प्रसाद देवधर, गिर्ये सरपंच रुपेश गिरकर यांनी येथील जनतेच्या रिफायनरी विरोधात भावना तीव्र असून त्यांच्या भावना समजून घ्याव्यात व माघारी जावे ,असे आवाहन प्रमोद जठार यांना केले.

अखेर जठार यांनी स्थानिकांच्या भावनांना मान देत माघारी परतण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी स्थानिकांसमोर बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर स्थानिकांच्या तीव्र भावना मांडून लवकरात लवकर बैठक आयोजित करण्याचे आश्‍वासन दिले. विजयदुर्ग पोलिस निरीक्षक संतोष कोळी व त्यांचे सहकारी, राज्य राखीव सुरक्षा दलाची फौज तैनात करण्यात आली होती. मात्र, स्थानिकांच्या मोठ्या प्रमाणात असलेल्या सहभागासमोर पोलिस कुमकही कमी पडली.

प्रमोद जठार यांच्यासमवेत माजी आ. अ‍ॅड.अजित गोगटे, भाजप जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, सभापती जयश्री आडिवरेकर, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, पं.स.सदस्य रवींद्र तिर्लोटकर, नगरसेविका हर्षा ठाकूर, महेश खोत, बबलू सावंत, वाघोटण सरपंच कृष्णा आमलोसकर आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते होते.तर स्थानिक जनतेसमवेत रामेश्‍वर सरपंच विनोद सुके, विजयदुर्ग सरपंच प्रसाद देवधर, जि.प.सदस्या वर्षा पवार, रामेश्‍वर संघर्ष समिती अध्यक्ष सुरेश केळकर, गिर्ये संघर्ष समिती अध्यक्ष मुनाफ  ठाकूर व ग्रामस्थ उपस्थित होते.