होमपेज › Konkan › रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांत आयुर्वेद रिसर्च सेंटर सुरू करावे

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांत आयुर्वेद रिसर्च सेंटर सुरू करावे

Published On: Jul 19 2018 10:31PM | Last Updated: Jul 19 2018 10:22PM
चिपळूण : प्रतिनिधी
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आयुर्वेद रिसर्च सेंटर सुरू करावे यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार व शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी नुकतीच केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी नाईक यांनी याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पश्‍चिम घाट येतो. या घाटामध्ये अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत. जगभरातील दुर्मीळ अशा वनस्पती या भागात आढळून येतात. भारतीय वैद्यक क्षेत्रात आयुर्वेदाला महत्त्व आहे. मात्र, कोकणात आढळणार्‍या या औषधी वनस्पतींबाबत फारसे संशोधन झालेले नाही. येथील जैवविविधता लक्षात घेऊन या औषधी वनस्पतींचा अभ्यास आणि वर्गीकरण होणे गरजेचे आहे. 
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये अशाप्रकारे आयुर्वेद रिसर्च सेंटर सुरू झाल्यास येथील औषधी वनस्पती खर्‍या अर्थाने उजेडात येतील व त्याचा खूप मोठा फायदा होईल. कोकणात अनेक ठिकाणी आजही या औषधी वनस्पती अनेक रोगांवर वापरल्या जातात. त्याचे जतन होण्यासाठी या जिल्ह्यांत 
आयुर्वेद रिसर्च सेंटर सुरू करणे गरजेचे आहे. या संदर्भात खा. राऊत यांनी निवेदन दिले. यावेळी त्यांनी ना. श्रीपाद नाईक यांच्याबरोबर चर्चा केली. या चर्चेत त्यांनी आयुर्वे रिसर्च सेंटरसाठी सकारात्मकता दर्शवली आहे.