Tue, Apr 23, 2019 23:59होमपेज › Konkan › ‘नाणार’विरोधात जागृती रॅली

‘नाणार’विरोधात जागृती रॅली

Published On: May 18 2018 11:16PM | Last Updated: May 18 2018 10:41PM राजापूर : प्रतिनिधी

रिफायनरी प्रकल्पाविरोधात दि. 30 मे रोजी काढण्यात येणार्‍या महामोर्चासाठी जोरदार जनजागृतीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी नाणार परिसरातील जनतेने आपल्या जमिनींची विक्री केली जाऊ नये म्हणून खबरदारी घेतानाच प्रकल्प विरोधी संघटनांनी शुक्रवारी तालुक्यातील साखर येथे जागृती रॅली काढली. नाणार परिसराच्या आजुबाजूच्या गावांमधील जमिनींवर देखील दलांलांच्या नजरा असून, ते प्रयत्न हाणून पाडण्यासाठी प्रकल्पविरोधी संघटना सरसावल्या आहेत. या परिसरातील जनतेने आपल्या मौल्यवान जमिनींची विक्री करु नये, यासाठी जनजागृतीचे काम सुरु झाले आहे.

याच पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी साखर येथे रिफायनरीला विरोध दर्शवणारे टी-शर्ट्, टोप्या तसेच महिलांना गळ्यातील  जागृती पट्ट्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी संतोष घाडी यांनी एक अंकी नाटक सादर करताना रिफायनरीविरोधात जमिनींची विक्री करणार्‍यांपासून दलाल ते परराज्यातील  भूमाफिया या सर्वांबाबत जागृती केली. प्रकल्पाविरोधात दि. 30 मे रोजी राजापूर तहसील कार्यालयावर महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. त्याची जोरदार तयारी सुरु आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ही जनजागृती हाती घेण्यात आली आहे.  जनजागृतीसाठी साखरमध्ये झालेल्या कार्यक्रमात लेझिम पथकाचाही सामावेश होता. प्रकल्प विरोधी संघटनांनी आपल्या विरोधाची धार अधिक वाढविली आहे.