Fri, Feb 22, 2019 10:12होमपेज › Konkan › उल्लेखनीय काम करणार्‍या कृषी गटांना पुरस्कार

उल्लेखनीय काम करणार्‍या कृषी गटांना पुरस्कार

Published On: Sep 06 2018 1:41AM | Last Updated: Sep 05 2018 8:19PMरत्नागिरी ःप्रतिनिधी

कोकणात पारंपरिक पद्धतीने करण्यात येणार्‍या गट शेतीला मान्यता देण्यात आली असून या योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी शेतकरी संख्या वाढविण्याबरोबरच  क्षेत्र वाढीवरही अनुदानामध्ये वाढ होणार आहे. तसेच समूह शेती करणार्‍या गटाला पुरस्कार देण्यात  येणार आहे.

या योजनेसाठी शेतीगटाची सहकारी तत्त्वावर नोंदणी करण्यात येणार आहे. या गटांना एक कोटीचे अनुदान देण्यात येणार आहे. गटशेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी या योजनेत कृषी औजार बँकेचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक एस. एस. जगताप यांनी दिली.  

कोकणातील भातशेती ही पारंपरिक पद्धतीने करण्यात येते. गट सहकार्य तत्वावर ही शेती करण्याची पद्धत आहे. पारंपरिक पद्धतीने हा व्यवसाय करताना बैलजोडी, नांगरणी, लावणी आणि अन्य कामे समूहाने आणि सहकारी तत्वावर करण्यात येत होती. आता शासनाने या शेतीला मान्यता देताना शेतकरी गटनोंदणी अनुदान योजना जाहीर केली आहे. 

या योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी शेतकरी संख्या वाढविण्याबरोबरच  क्षेत्र वाढीवरही अनुदानामध्ये वाढ होणार आहे. तसेच समूह शेती करणार्‍या गटाला पुरस्कार देण्यात येणार असून यामध्ये पहिल्या तीन क्रमांकांसाठी अनुक्रमे 25, 15, आणि 5 लाख रुपये पारितोषिक स्वरुपात देण्यात येणार आहे. पीक पद्धतीमध्ये आदर्श पॅटर्न निर्माण करणार्‍या शेतकर्‍यांना पारितोषिकाने सन्मानित करण्यात येणार आहे.या योजनेत पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्य व्यवसायाचाही समावेश करण्यात आला असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.