Wed, Jun 26, 2019 17:27होमपेज › Konkan › सोशल मीडियावरील अनोळखी मैत्री टाळा 

सोशल मीडियावरील अनोळखी मैत्री टाळा 

Published On: Jan 08 2018 1:14AM | Last Updated: Jan 07 2018 10:49PM

बुकमार्क करा

सिंधुदुर्गनगरी  प्रतिनिधी 
 

इंटरनेट टेक्नॉलॉजीमुळे बसल्या जागेवरून एखादी व्यक्‍ती कुठे जातेय, याचा शोध घेता येतो. सोशल मीडियावरही हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे अनोळखी व्यक्‍ती असल्यास सोशल मीडियावारील मैत्री टाळा. हमी असली तरच ऑनलाईन शॉपिंग करा. क्रेडिट कार्ड, बँक डिटेल्स कोणालाही देऊ नका,असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी शनिवारी जिल्हावासीयांना केले. पत्रकार दिनानिमित्त आयोजित सायबर गुन्हे व सोशल मीडिया’ या विषयावर बोलताना त्यांनी हा सावधानतेचा इशारा दिला आहे.

औद्योगिक विकास झपाट्याने होण्यास इंटरनेट टेक्नॉलॉजी महत्त्वाची ठरली आहे. आजच्या युगात या आधुनिक तंत्रज्ञानाची क्षणाक्षणाला गरज वाटत आहे. मात्र, याचा नकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. गुपित असलेल्या गोष्टी उघड होत आहेत. वैयक्तिक फायद्यासाठी फिशिंग, बुकिंग अशा वेबसाईट येत आहेत. त्यासाठी सरकारच्या नावाचा वापर केला जातो. मात्र, या वेबसाईट वैयक्तिक फायद्यासाठी वापरल्या जातात. त्यामुळे कोणत्या वेबसाईट उघडाव्यात याची प्रथम माहिती घ्यावी, असे आवाहन यावेळी श्री.गेडाम यांनी केले.

इंटरनेटमुळे काही गोष्टी खूप सोप्या झाल्या आहेत. यापूर्वी सायबर क्राईममधील आरोपी मोबाईल मुळे कुठे आहेत? हे सहज समजत होते. मात्र, त्यांनी आता त्यापुढील तंत्रज्ञानाचा वापर सुरू  केला आहे. कॉल करून मिळविलेले बँक खाते माहितीद्वारे वळती केलेले पैसे परदेशात जातात. त्यामुळे त्यांचा शोध लागत नाही. परिणामी याबाबत सर्वानी काळजी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन श्री.गेडाम यांनी केले. ई- मेल आयडी व मोबाईल पासवर्ड कोणाला सांगू नका, शक्यतो तो बदलत राहा, असाही सल्ला त्यांनी दिला. महाराष्ट्र शासनाने सायबर गुन्हेगारांवर वचक बसण्यासाठी इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी कायदा दिला आहे. त्यानुसार जिल्ह्यात सायबर सेल स्थापन करण्यात आला असून टेक्नॉलॉजी तज्ज्ञ व इंजिनिअर असलेल्या अधिकार्‍यांची नियुक्‍ती केली आहे. विविध सॉफ्टवेअर व डिव्हाइसेस उपलब्ध आहेत. सोशल मीडियावर एखादी आलेली पोस्ट मूळ कोणी टाकली आहे ? याचाही शोध घेणारी यंत्रणा आपल्याकडे आहे. त्याद्वारे सायबर गुन्हे आम्ही रोखू शकतो, असे यावेळी श्री.गेडाम यांनी सांगितले.