Thu, Jul 18, 2019 02:56होमपेज › Konkan › स्वयंचलित हवामान केंद्रे देणार वीज कोसळण्याची पूर्वसूचना

स्वयंचलित हवामान केंद्रे देणार वीज कोसळण्याची पूर्वसूचना

Published On: May 06 2018 1:09AM | Last Updated: May 06 2018 12:04AMरत्नागिरी : प्रतिनिधी

कोकणात पावसाळ्यात होणारी अतिवृष्टी आणि कडकडाटासह वीज कोसळण्यासारखी नैसर्गिक आपत्ती रोखण्यासाठी जिल्ह्यातील स्वयंचलित हवामान केंद्रे आता वीज कोसळण्याबाबतचा अंदाजही वर्तविणार आहेत. त्यामुळे खरिपाच्या हंगामात वीज कोसळून होणार्‍या दुर्घटना टाळण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यात अशी 29 स्वयंचलित हवामान केंद्रे असून, ही केंद्रे वीज पडण्याची आगाऊ सूचना आगामी पावसाळ्यात शेतकर्‍यांना देणार आहेत. 

कोकणात पावसाळा हा नैसर्गिक आपत्तींचा काळ असतो. या हंगामात सर्वाधिक आपत्ती घडतात. बहुतांश आपत्ती नैसर्गिक असतात. मात्र, त्याचा परिमाण कोकणात वित्तहानी बरोबरच मनुष्यहानीवरही होत असतो. यासाठी ‘महावेध’तर्फे कोकणात स्वयंचलित हवामान केंद्रे सज्जानुसार उभारण्यात आली आहेत. या केंद्रांतर्फे पावसाबरोबरच आता आर्द्रता, तापमान याबाबत पंधरवड्याचा लेखाजोखा शेतकर्‍यांना देण्यात येतो. दर तासाला बदलणारे हवामानही या केंद्रातर्फे उपलब्ध करुन देण्यात येते. आता या केंद्रांतून वीज पडण्याचा अंदाजही वर्तविण्यात येणार आहे.

कोकणात पावसाळ्यात वीज पडल्याने अनेक दुर्घटना घडल्या आहेत. यामध्ये शेती उपयुक्‍त जनावरे तसेच माणसाचा मृत्यूही झाला आहे. मात्र, अशा दुर्घटना टाळण्यासाठी  स्वयंचलित हवमान केंद्रे आता सज्ज करण्यात आली आहेत. या केंद्रातर्फे पावसाळ्यात कोसळणार्‍या विजेचा अंदाज तालुक्यासह स्थळासह देण्यात येणार आहे. यासाठी केंद्रांना ‘जिओ टँगिंग’द्वारे स्थळांची निश्‍चित करण्यात आली आहे. यानुसार स्वयंचलित हवामान केंद्रे वीज कोसळण्याची स्थळे 15 दिवस आधी आणि तातडीच्या सूचनेअंतर्गत दोन दिवस आधी देण्यासाठी सक्षम करण्यात आली आहे. या सूचना शेतकर्‍यांना आणि सामान्य नागरिकांना मोबाईलद्वारेही देण्याची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. कृषी सल्ला केंद्राचे अ‍ॅप वापरणार्‍या शेतकर्‍यांना या आपत्तीच्या सूचना  बसल्या जागेवरच मिळणार आहेत.