Sun, Dec 08, 2019 20:07होमपेज › Konkan › गिरणी कामगारांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्नशील 

गिरणी कामगारांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्नशील 

Published On: Apr 16 2019 2:17AM | Last Updated: Apr 16 2019 12:15AM
सावंतवाडी : प्रतिनिधी 

जिल्ह्यातील गिरणी कामगारांचे प्रश्‍न जाणून घेऊन त्यांच्या सोडवणुकीसाठी पुढील काळात प्रयत्न करण्यात येतील, असे  ‘म्हाडा’चे अध्यक्ष उदय सामंत यांनी सांगितले. 

कोकण  म्हाडाचे संचालक शैलेश परब, सिंधुदुर्ग जिल्हा गिरणी कामगार संघाचे अध्यक्ष दिनकर म्हसगे, श्यामसुंदर कुंभार,  लॉरेन्स डिसोझा, राजेंद्र पडते, रामचंद्र कोठावळे, सुभाष परब, सुभाष नाईक , रुपेश गवस, कृष्णा माधव, रेखा लोंढे, सुमित्रा परब, सविता आरोलकर, स्मिता धाऊसकर, सीमा मांजरेकर, विश्‍वनाथ कुबल आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात सुमारे  15 हजार  500 गिरणी कामगार आहेत. त्यांच्यासाठी जिल्ह्यात कॅम्प आयोजित करता येऊ शकतो, असे ते म्हणाले. पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या कार्यालयात  सिंधुदुर्ग जिल्हा गिरणी कामगारांशी संवाद साधल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत उदय सामंत बोलत होते .

ते म्हणाले, गिरणी कामगारांचे प्रश्‍न जाणून घेण्यासाठी आपण पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या  उपस्थित गिरणी कामगारांची बैठक घेऊन त्यांचे प्रश्‍न, समस्या जाणून घेतल्या. 
जिल्ह्यातील गिरणी कामगारांचे अनेक प्रश्‍न आहेत. मुंबईत घरासाठी कामगारांचे पैसे भरून घेण्यात आले आहेत, परंतु त्यांना ऑफर लेटर दिलेले नाही. तर काही जणांना ऑफर लेटर दिले आहे पण घराचा ताबा दिलेला नाही असे विविध प्रश्‍न आहेत. यासाठी  मुंबई म्हाडा व कोकण म्हाडा यांच्यावतीने  कामगारांसाठी कॅम्प घेऊन या अडचणी सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करु.  शिवाय दर तीन महिन्यांनी गिरणी कामगारांची बैठक घेणार असल्याचे  सामंत म्हणाले.

सामंत म्हणाले, मी सिंधुदुर्गचा सुपुत्र आहे.  जिल्ह्यातील गिरणी कामगारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न राहील. कोकण म्हाडाचे संचालक शैलेश परब हे देखील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात कॅम्प लावण्यासाठी पुढाकार घेतील. कामगारांच्या प्रश्‍नावर आग्रही आहोत.

राज्यातील एक लाख 74 हजार गिरणी कामगारांना घरे देण्याचा निर्णय झाला असल्याचे त्यांनी सांगितले. खोपोली येथे यश बिल्डरने सुमारे शंभर एकर जमिनीत पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधण्यास पुढाकार घेण्याचे निश्‍चित केले आहे. तेथे देखील गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी आपला प्रयत्न राहील, असे सामंत म्हणाले.

 गिरणी कामगारांना एमएमआरडीच्या  माध्यमातून 25 हजार घरे बांधून देण्याचे ठरले आहे तसेच  11 हजार घरांची लॉटरी निश्‍चित झाल्याचे त्यांनी सांगितले.