होमपेज › Konkan › वन कर्मचार्‍यांवर कुर्‍हाडीने हल्‍ला

वन कर्मचार्‍यांवर कुर्‍हाडीने हल्‍ला

Published On: Mar 04 2018 1:42AM | Last Updated: Mar 03 2018 10:39PMकुडाळ : वार्ताहर

शासकीय वनक्षेत्रातील झाडांची तोड करून नेत असताना अटकाव केला म्हणून वन कर्मचार्‍यांवरच कुर्‍हाडीने  हल्‍ला केला. ही घटना कालेली गावातील शासकीय वनक्षेत्रात शुक्रवारी सायंकाळी उशिरा घडली. याप्रकरणी वनविभागाने मधुकर परब व महेश घाडी या दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांना शनिवारी कुडाळ न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन दिवस वन कोठडी सुनावली आहे. यातील तिसरा संशयित बाळकृष्ण अर्जुन घाडी हा फरार आहे. अन्य एक चौथा आरोपी असल्याचे वनअधिकार्‍यांनी सांगितले. या हल्ल्यात वनरक्षक सुनील शिवाजी भंडारे यांच्या हाताला  गंभीर दुखापत झाली आहे.

स्वतंत्रपणे दोन गुन्हे दाखल

याप्रकरणी तिघांवर  वनकायद्यानुसार तसेच पोलिस स्थानकात दोन स्वतंत्र  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  

कुडाळ वनपरिक्षेत्राचे वनरक्षक शिवाजी भंडारे यांच्याकडे मोरे, कालेली व कांदुळी या तीन गावातील  जंगलांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आहे. त्यांच्या मदतीला वनमाळी तेली आहेत. मोरे व कालेली वनक्षेत्रात चोरटी वृक्षतोड होत असल्याची माहिती मिळल्याने या  दोघांनीही दोन्ही गावात स्वतंत्र गस्त घालण्याचे ठरवले.   यानुसार शुक्रवारी 2 फेब्रुवारी रोजी भंडारे व तेली यांनी सकाळी 7.30 वा. वनक्षेत्रात गस्त सुरू केली.

तेली हे कालेली वनक्षेत्रात गस्त  घालत  असताना सायं. 6 वा. च्या सुमारास  त्यांना जंगलात वृक्षतोड होत असल्याचा आवाज ऐकू आला. याबाबत त्यांनी श्री. भंडारे  यांना मोबाईलद्वारे  कालेली वन सर्व्हे नं. 52 कक्ष क्र. 115 (अ) मध्ये झाडांची तोड होत असल्याची माहिती दिली.  श्री. भंडारे यांनी ही माहिती वनरक्षक गुरूनाथ देवळी यांना दिली. त्यानंतर श्री. भंडारे व श्री. देवळी हे कालेली येथे गेले. यावेळी जंगलात  झाडे तोडल्याचा आवाज येत असल्याने या तिघांनीही लाकूड चोरट्यांना पकडण्यासाठी सापळा रचला. काळोख पडू लागल्याने काही वेळातच तिघेजण या जंगलातून झाडाचा एक ओंडका तोडून आणताना दिसून आले. यावेळी वनरक्षक श्री. देवळी, श्री. भंडारे व श्री. तेली यांनी प्रत्येकी एका इसमाला अंगावर झडप घालून पकडले.

दरम्यान श्री. भंडारे यांनी पकडलेल्या इसमाने  कुर्‍हाडीचा दांडा श्री. भंडारे यांच्या डोक्यात मारला. मात्र, श्री. भंडारे यांनी न डगमगता त्याला पुन्हा पकडले. यानंतर चोरट्याने त्यांच्यावर कुर्‍हाडीच्या पात्यांने वार केला. हा वार चुकविण्यासाठी श्री. भंडारे यांनी दोन्ही हात पुढे केल्याने त्यांच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली. मात्र त्या परिस्थितीतही भंडारे यांनी चोरट्याला मोठ्या हिंमतीने पकडून ठेवले. दरम्यान या झटपटीत वनमाळी तेली यांची चोरट्यावरील पकड ढिली  झाल्याने संशयित बाळकृष्ण अर्जुन घाडी (रा.कालेली) याने त्यांच्या हाताला हिसका देवून त्यांना खाली पाडून पळून गेला.

काही वेळ चाललेल्या या झटापटीनंतर  मधुकर रामचंद्र परब व महेश विठ्ठल घाडी (रा. कालेली) या दोघा चोरट्यांना माणगाव वनपरिमंडल कार्यालयात  आणले. या तिघांवरही वनविभागाने भारतीय वन अधिनियम  1927 व महाराष्ट्र वन नियमावली 2014 नुसार गुन्हा दाखल आहे. तर वनरक्षक सुनील भंडारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, शासकीय कर्मचार्‍यांवर प्राणघातक हल्‍ला करणे याप्रकरणी पोलिसांनी या तिघांवरही गुन्हा दाखल केला आहे.