होमपेज › Konkan › मत्स्य महाविद्यालय ‘नागपूर’शी संलग्‍न करा

मत्स्य महाविद्यालय ‘नागपूर’शी संलग्‍न करा

Published On: Aug 19 2018 1:31AM | Last Updated: Aug 18 2018 9:11PMरत्नागिरी : प्रतिनिधी

येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालय कोकण कृषी विद्यापीठाला जोडण्याच्या राज्य शासनाचा अध्यादेश रद्द करावा व हे महाविद्यालय नागपूरच्या पशुविज्ञान विद्यापीठास सलग्‍न करावे, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे कोकणात स्वतंत्र मत्स्य विज्ञान विद्यापीठ गठित करावे यासाठी प्रयत्न करणे आवश्यक बनले आहे.

राज्यातील एकूण मत्स्य उत्पादनापैकी 72 टक्के म्हणजेच 4.4 लाख मेट्रिक टन उत्पादन राज्याच्या 720 कि.मी. लांब कोकण किनारपट्टीवर होते. तरीदेखील मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोकण किनारपट्टीपासून 1 हजार कि.मी. लांब असणार्‍या नागपूर येथील पशुविज्ञान विद्यापीठाला 1998 मध्ये जोडले गेले. मात्र, याबाबत कोकणातून बरीच ओरड झाल्यावर सन 2000 मध्ये राज्य शासनाने नोटिफिकेशन काढून मत्स्य विज्ञान महाविद्यालय दापोलीच्या कृषी विद्यापीठाला सलग्‍न ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर मत्स्य विद्यापीठ कायद्यात बदल होणे आवश्यक होते व दापोली कृषी विद्यापीठ मत्स्य विज्ञान विषयातील पदविका देण्यास सक्षम असल्याची भूमिका राज्य शासनाने घेणे आवश्यक होते. या विषयासंदर्भात राज्य शासनाने नेमलेल्या डॉ. मुणगेकर समितीचा अहवालही सध्या धूळखात पडून आहे. 

कोकणातील नद्या, खाड्या, समुद्र व पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत असणार्‍या 70 खाड्यांच्या भोवतीचा 14 हजार 445 हेक्टर खादण क्षेत्र मत्स्य शेतीसाठी उपलब्ध असल्याने कोकणातील विद्यार्थ्यांना फिशरिज इंजिनिअरिंगचे पदवीपर्यंत शिक्षण उपलब्ध करून देण्याची गरज आहे. फिशरिज इंजिनिअरिंगचे पदविका, पदवी व पदव्युत्तर शिक्षण कोकणात उपलब्ध झाले पाहिजे. विशेषकरून मत्स्य उपलब्ध व्यवस्थापन, मत्स्य पर्यावरण, मत्स्य काडणीपश्‍चात तंत्रज्ञान, मत्स्य संवर्धन, मत्स्य जलशास्त्र आणि मत्स्य शिक्षण विस्तार आदी अभ्यासक्रमांचा अंतर्भाव होणे आवश्यक आहे.

राज्यात गोड्या पाण्याच्या क्षेत्रात 1 लक्ष 25 हजार टन तर कोकण किनारपट्टीवर 4 लक्ष टन मत्स्य उत्पादन होते. ही गोष्ट लक्षात घेणे महत्वाचे आहे. केरळ व तामिळनाडूमध्ये स्वतंत्र मत्स्य विद्यापीठ सुरू झाले आहे. कोकण किनारपट्टीवर मत्स्य उत्पादनाची एवढी उपलब्धी असूनही अद्यापही त्याबाबत शासनाकडून कोणतीच पावले उचलली गेली नाही. रत्नागिरी, नागपूर आणि उदगीर येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालये एकत्र करून कोकणात स्वतंत्र मत्स्य व समुद्र विज्ञान विद्यापीठ सुरू करण्यात यावे.

नागपूर खंडपीठात रियाज हाफिज शेख व त्याच्या सहकार्‍यांनी केलेली याचिका दाखल करून घेण्यात आलेली आहे. दापोली कृषी विद्यापीठाला मत्स्य विज्ञान संबंधी पदवी प्रदान करण्याचा अधिकार नाही, असेही याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे गेल्या 18 वर्षांत पदवी, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट मिळवलेल्या सुमारे 1 हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य या याचिकेवर अवलंबून राहिले आहे. त्यामुळे शासनाने मुणगेकर समितीच्या अहवालावर तातडीने कार्यवाही करून कोकणासाठी स्वतंत्र मत्स्य विज्ञान विद्यापीठ सुरू करावे, अशी मागणी होत आहे.