Sat, Dec 14, 2019 03:30होमपेज › Konkan › अरुणा प्रकल्पग्रस्तांनी रोखले जलवाहिन्यांचे काम

अरुणा प्रकल्पग्रस्तांनी रोखले जलवाहिन्यांचे काम

Published On: Jun 05 2019 1:29AM | Last Updated: Jun 04 2019 10:31PM
वैभववाडी : प्रतिनिधी 

अरुणा प्रकल्पाच्या पुनर्वसन गावठाणांसाठी मांगवली-ढवळेवाडी येथे बांधलेल्या बेकायदेशीर विहिरीमुळे नळपाणी योजनेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे पुनर्वसन गावठाणासाठी पोलिस बंदोबस्तात सुरू केलेले जलवाहिन्यांचे काम ग्रामस्थांनी दुपारी बंद पाडले.

अरुणा प्रकल्पग्रस्तांसाठी उभारण्यात येणार्‍या पुनर्वसन गावठाणात पाणीपुरवठा करण्यासाठी मांगवली-ढवळेवाडी येथे सन 2012 मध्ये विहीर बांधण्यात आली आहे. या विहिरीचा मांगवली गावच्या नळपाणी पुरवठा योजनेवर परिणाम झाल्याचा आक्षेप ग्रामस्थांचा होता. याशिवाय धरणावरील अवजड वाहनांमुळे नादुरुस्त झालेल्या रस्त्याची दुरुस्ती करावी, पुनर्वसनासाठी संपादित केलेल्या गावातील जमीनमालकांना मोबदला द्यावा, आपत्कालीन स्थितीत विहिरीवरून पाणीउपसा करण्याची परवानगी द्यावी या मागण्यांसाठी ग्रामस्थांनी सन 2013 मध्ये आंदोलन छेडले होते. त्यावेळी या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्‍वासन पाटबंधारे विभागाने ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांना दिले होते. परंतु यापैकी एकाही आश्‍वासनाची पूर्तता केलेली नाही. यासंदर्भात ग्रामस्थांनी तहसीलदारांना निवेदन दिले होते. मंगळवारी सकाळी ग्रामस्थांनी तहसीलदार रामदास झळके यांची भेट घेतली. त्याचवेळी तेथे प्रांताधिकारी हजर होते. दोन्ही अधिकार्‍यांनी आपण जिल्हाधिकार्‍यांची भेट घ्यावी असे सूचित केले. 

पाटबंधारे विभागाच्या या मनमानीमुळे संतप्त मांगवली ग्रामस्थांनी दुपारी काम बंद पाडले आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्या शारदा कांबळे, सरपंच राजेंद्र राणे, माजी सरपंच महेश संसारे, शिवाजी नाटेकर, प्रसाद जावडेकर, हरिश्‍चंद्र तेली,  सुनील गुरव, प्रकाश वाडेकर, सुनील देवरुखकर, महेश आयरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यकारी अभियंता डवरी यांनी घटनास्थळी जात आम्हाला काम करू द्या. नाहीतर मला रिपोर्ट करावा लागेल असे ग्रामस्थांना धमकावल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. प्रलंबित प्रश्‍न मार्गी लागेपर्यंत जलवाहिन्यांचे काम करू न देण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

दरम्यान आज, बुधवारी  मांगवलीतील पुनर्वसन आणि कालव्यांसाठी भूसंपादन केलेल्या शेतकर्‍यांना अद्याप मोबदला दिला गेला नसल्यामुळे शेेतकर्‍यांची बैठक होणार आहे. त्या बैठकीत गावातील प्रलंबित समस्यांबाबत पुढील दिशा ठरविली जाणार आहे.

ग्रामस्थांना गाफील ठेवून काम

मध्यम पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी गेल्या शुक्रवारी ग्रामस्थांच्या मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना आणून चर्चा करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, ग्रामस्थांना गाफील ठेवून चक्‍क पोलिस बंदोबस्तात मंगळवारी जलवाहिन्यांचे काम सुरू केल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला.