Tue, Apr 23, 2019 18:21होमपेज › Konkan › ‘जनआक्रोशा’चे आमरण उपोषणात रुपांतर!

‘जनआक्रोशा’चे आमरण उपोषणात रुपांतर!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

दोडामार्ग : प्रतिनिधी

दोडामार्ग तालुकावासीयांनी आरोग्याच्या विविध मागण्यांसाठी सुरू केेलेल्या बेमुदत आक्रोश आंदोलनाचे सोमवारी आमरण उपोषणात रूपांतर झाले. दरम्यान, सायंकाळी उशिरा तेरवण-मेढे येथील सुहासिनी गवस यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. महाराष्ट्र सरकार विरोधात आता दोडामार्गवासीयांनी आंदोलन अधिक तीव्र केले असून होणार्‍या परिणामांना सरकार जबाबदार राहील, असा इशारा संयोजकांनी दिला आहे.  

आरोग्याचा जनआक्रोश या मथळ्याखाली दोडामार्ग तालुक्यातील नागरिकांनी आरोग्याच्या विविध मागण्यांसाठी मंगळवार 20 मार्चपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलन काळात अनेक राजकीय नेते यांनी भेटी देवून पोकळ आश्‍वासने दिली. मात्र ठोस निर्णय झाला नसल्याने हे आंदोलन गेले सात दिवस सुरू  आहे.

आक्रोश आंदोलनाची दखल न घेतल्यास आमरण उपोषण छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला होता. सोमवारपासून या आमरण उपोषणास प्रारंभ करण्यात आला. या उपोषणासाठी दोन टीम बनविण्यात आल्या आहेत. यात स्त्री-पुरूष  यांचा समावेश आहे. मंगळवारपासून या टीममध्ये वाढ होईल असे संयोजकांनी सांगितले आणि हे साखळी उपोषण असेल असेही संयोजक म्हणाले. सोमवारी सकाळी खा.विनायक राऊत यांनी आंदोलनस्थळी भेट दिली आणि आंदोलनास  शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे सांगितले.

लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून आरोग्याबाबत असलेल्या सर्व मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढतील, असे सांगितले. यावेळी तेरवण-मेढे सरपंच प्रवीण गवस यांनी खा.राऊत यांना सवाल करत आम्ही बेमुदत आंदोलनाचे निवेदन तुूहाला दिले असता तुम्ही  आंदोलन करण्याची वेळ येणार नाही असेही म्हणाला होता. यावर आपण काय केलात? किंबहुना आंदोलनाला सात दिवस झाले आणि आपण आता आलात, यावर आता चर्चा करायला आलात की निर्णय घेवून आलात, असा प्रश्‍न श्री. गवस यांनी केला. त्यानंतर खा.राऊत यांनी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात जावून रूग्णालयाची पाहणी करत सुविधा वाढविणार असल्याचे स्पष्ट केले.  सोमवारी माजी आ.शिवराम दळवी, कुडाळचे माजी आ. पुष्पसेन सावंत, मालवणचे मच्छीमार नेते रवीकिरण तोरसकर, रमेश धुरी, अखिल दोडामार्ग प्राथमिक शिक्षक संघ, दोडामार्ग यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत मार्गदर्शन केले.

मच्छीमार नेते रवीकिरण तोरसकर म्हणाले, दोडामार्गवासीयांचे आंदोलन योग्य असून आपल्या सर्व संघटनांचा जाहीर पाठिंबा आहे. हजारो शेतकर्‍यांचा जसा नाशिक ते मुंबई पायी मोर्चा निघाला तसाच दोडामार्गपासून असा मोर्चा निघण्यासाठी आपण नियोजन करूया. आपला पूर्ण पाठिंबा राहणार असल्याचे  सांगितले.  सिंधुदुर्गमध्ये 36 मच्छीमार गावे आहेत ही सर्व गावे 28 पर्यंत जर सरकारने योग्य निर्णय आरोग्याच्या विविध मागण्यांवर घेतले तर ठीक अन्यथा सर्व गावातील प्रत्येक ग्रा.पं. येथे अर्धा दिवस जनआक्रोश आंदोलनाला पाठिंबा म्हणून धरणे आंदोलन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्राने सिंधुदुर्गची आरोग्यसेवा सक्षम करावी

गोव्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर व्हिडीओ जारी केला.  हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांनी म्हटले आहे, महाराष्ट्रातील एका मंत्र्याने मला पत्र पाठवले आहे,  यात म्हटले आहे की गोव्यात जे परप्रांतीयांना रूग्ण शुल्क घेण्यात येते ते बंद करावे म्हणून मी काय ते बंद करणार नाही. मला गोव्याची आरोग्य यंत्रणा अधिक सुधारायची आहे. महाराष्ट्र सरकारने सिंधुदुर्गात चांगल्या आरोग्याच्या सुविधा तेथील लोकांना प्राप्त करून द्याव्यात आणि मी जो निर्णय घेतला आहे तो बदलणार नसल्याचे स्पष्ट केले. हा सर्व व्हिडीओ कोकणी भाषेत आहे.

 

Tags : Dodamarg, Dodamarg news, health demands, movement,


  •