Tue, Jul 23, 2019 04:03होमपेज › Konkan › नोकरीचे नव्हे, हज यात्रींच्या सेवेचे ‘अरमान’चे अधुरे!

नोकरीचे नव्हे, हज यात्रींच्या सेवेचे ‘अरमान’चे अधुरे!

Published On: Jul 13 2018 10:48PM | Last Updated: Jul 13 2018 10:30PMदेवरूख : निलेश जाधव

सौदी अरेबियाला नोकरीला नव्हे, तर हज यात्रेला जाणार्‍या हज यात्रींची सेवा करण्याचे स्वप्न अरमान नाझीम खाँचे या 24 वर्षीय तरूणाने उराशी बाळगले होते. त्यासाठीची मुलाखत देवून त्यात उत्तीर्ण झाल्याच्या आनंदात मुंबईहून आपल्या गावी आई- वडीलांसोबत बुधवारी ट्रेनने परतत असतानाच नियतीने त्याच्यावर झडप घातली. अंजणी येथे ट्रेनमधून तोल जावून अरमान  खाली पडला आणि हजयात्रींची सेवा करण्याचे स्वप्न अधुरेच राहिले.
अरमान हा आई-वडीलांचा एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे तो आई-वडीलांचा अत्यंत लाडका होता. तो अतिशय प्रेमळ व थोडासा खोडकर स्वभावाचा होता. कोणी काहीही बोलले तरी हसतमुखाने तो एखाद्याशी बोलत असे. त्याच्या या शांत व प्रेमळ स्वभावामुळेच त्याने अनेक मित्र जोडले होते. तो एखाद्याच्या मदतीला धावून जात असे.   मुस्लीम धर्मामध्ये हज यात्रेला अनन्यसाधारण महत्व आहे. काही दिवसांनी सौदी अरेबियामध्ये या हज यात्रेला सुरूवात होणार होती. यात्रेला जगभरातून जाणार्‍या हज यात्रेकरूंची सेवा करण्याची अरमानची मनोमन इच्छा होती. आपली ही इच्छा प्रत्यक्षात साकार करण्यासाठी त्याची धडपड सुरू होती. ही सेवा करण्याची संधी मिळाल्याने अरमानला खूप आनंद झाला होता. यासाठी मुंबईला अरमानची मुलाखत होती. या मुलाखतीसाठी तो आई-वडीलांसोबत आठ दिवसांपूर्वी मुंबईला गेला होता. या मुलाखतीमध्ये तो उत्तीर्णही झाला. मुलाखतीत उत्तीर्ण झाल्यामुळे अरमानचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

मुलाखत आटोपून तो आई-वडीलांसोबत बुधवारी दुपारी 3 वा. मत्स्यगंधा एक्स्प्रेसने संगमेश्‍वर तालुक्यातील आंगवली-सोनारवाडी गावी येत असतानाच खेड तालुक्यातील अंजणी दरम्यान अरमानचा ट्रेनमधून पडून मृत्यू झाला. यावेळी सोबत असणार्‍या आई-वडीलांनी हंबरडा फोडला. आपल्या एकुलता एक लाडक्या मुलाचा डोळ्यादेखत अंत झाल्याने आई-वडीलांना मोठा मानसिक धक्का बसला. गुरूवारी अरमानवर अंत्यसंस्कार करण्यात आले.