Mon, Jan 27, 2020 11:48होमपेज › Konkan › महामार्ग बाधितांच्या विविध मागण्या मंजूर

महामार्ग बाधितांच्या विविध मागण्या मंजूर

Published On: May 22 2019 1:37AM | Last Updated: May 21 2019 10:30PM
झाराप तिठ्यावर होणार सर्कल

कुडाळ : प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्ग क्र.66 वरील झाराप तिठा येथे सर्कल व्हावे याकरिता खा. विनायक राऊत यांच्याकडे येथील प्रमुख मंडळीसह ग्रामस्थांनी सुरूवातीपासूनच मागणी लावून धरली होती. अखेर खा. विनायक राऊत यांच्या उपस्थितीत हायवे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद बनगोसावी, ठेकेदार कंपनीचे प्रमुख अधिकारी यांनी झाराप तिठा येथे मंगळवारी प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. झाराप तिठा येथील सर्कलचे प्लॅन तयार करून याठिकाणी सर्कल बनविले जाईल अशी ग्वाही श्री.बनगोसावी यांनी दिली. 

पावसाळ्यापूर्वी याठिकाणचे रस्ता दुतर्फा पाण्याचे मार्ग मोकळे करण्याबाबत ठेकेदार कंपनीला श्री. बनगोसावी यांनी सूचना केल्याने झाराप येथील सर्कल व पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

झाराप तिठा येथून माणगांव व वेंगुर्लेकडे जाणारे महत्वाचे दोन मार्ग आहेत. दोन्ही मार्गावर वाहणांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते, त्यातच हायवेचे चौपदरीकरण झाल्याने आता वाहनाचा स्पीड ताशी 100 ते 120 च्या पुढे राहणार आहे. सहाजिकच याठिकाणी वाहनाच्या अपघाताची शक्यता अधिक असल्याने याठिकाणी सर्कल व्हावे याकरिता ग्रामस्थांनी खा. राऊत यांचे सुरुवातीपासूनच लक्ष वेधले होते. पंधरा दिवसापूर्वी खा.राऊत यांनी झाराप तिठा येथे भेट देवून हायवे बांधकामाची पाहणी करत सर्कलबाबत ग्रामस्थांची मागणी रास्त असल्याचे सांगितले. त्यानंतर मंगळवारी हायवे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद बनगोसावी, ठेकेदार कंपनीचे गौतम, श्री.शुक्ला, श्री.रवी आदींसमवेत भेट दिली.  आ.वैभव नाईक, जि. प. गटनेते नागेंद्र परब उपस्थित होते.  खा.राऊत यांनी याठिकाणी किमान 40 टन क्षमतेच्या गाड्या फिरतील असे सर्कल बांधण्याची सूचना श्री.बनगोसावी यांना केली. त्यावर  झाराप तिठ्यावर सर्कल ठेवण्यात आले असून त्या सर्कलच्या डिझाईनचे काम सुरू असून लवकरच सर्कलचे काम हाती घेतले जाईल, अशी ग्वाही श्री. बनगोसावी यांनी दिली. सर्कलचे डिझाईन आपल्याला दाखवून नंतरच काम सुरू करा, अशा सूचना खा.राऊत यांनी केल्या.

झाराप तिठा येथील रस्ता दुतर्फा पाण्याचे मार्ग हायवे खोदाई कामादरम्यान बंद झाले आहेत. परिणामी पावसाळ्यात ग्रामस्थांना त्रास होणार असल्याकडेे ग्रामस्थांनी खा. राऊत यांचे लक्ष वेधले. यावेळी श्री. बनगोसावी यांनी पावसापूर्वी पाण्याचे मार्ग मोकळे करा, अशा सूचना ठेकेदार कंपनीच्या अधिकार्‍यांना केल्या. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात भराव टाकल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत असल्याची कैफियत मांडली असता सदर मार्ग खुले करून दिले जातील असे श्री.बनगोसावी यांनी सांगितले. सरपंच स्वाती तेंडोलकर यांनी झाराप तिठा येथे सर्कल व्हावे,  उपकेंद्राकडे जाणार्‍या मार्गावर लेवल कट ठेवावा,आरओ डब्ल्यूमधून डे्रनेज पाईप लाईन करुन मिळावी, झाराप तिठा व जांभळ येथे बस स्टॉप बांधून मिळावेत, कुंभारवाडी रस्ता ते झिरो पाँईट पर्यंत सर्व्हिस रोड मिळावा आदी मागण्यांचे खा.राऊत यांच्याकडे निवेदन दिले.माजी उपसभापती बबन बोभाटे, तुकाराम गोडे, प्रदीप तेंडोलकर, राजू तेंडोलकर, सूर्यकांत सामंत, सुहास सामंत आदी उपस्थित होते.

तरंदळे फाट्यावर अंडरपास!

कणकवली : प्रतिनिधी

कणकवली-देवगड तालुक्यातील सुमारे 15 ते 20 गावांना जोडणार्‍या तरंदळे फाट्यावर स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून अंडरपास मंजूर करण्यात आला आहे. जानवलीतील महामार्गालगतचे मारूती मंदिर देखील बाधित होवू देणार नाही अशी ग्वाही खा.विनायक राऊत यांनी ग्रामस्थांना  दिली. 

जानवली गावातील प्रकल्पग्रस्त आणि नागरीकांच्या महामार्ग चौपदरीकरणा बाबतच्या समस्या जाणून घेण्यासाठी खा.विनायक राऊत यांनी मंगळवारी सायंकाळी महामार्ग प्राधिकरणच्या अधिकार्‍यांसह मारूती मंदिर येथे ग्रामस्थांशी संवाद साधला. तत्पूर्वी तरंदळेफाटा येथे कलमठ व परिसरातील ग्रामस्थांचीही भेट घेतली. आ.वैभव नाईक, महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता प्रमोद बनगोसावी, उपअभियंता अमोल ओटवणेकर, भाजप नेते संदेश पारकर, जि.प.सदस्य नागेंद्र परब, परशुराम झगडे, नगरसेवक सुशांत नाईक, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, विधानसभा मतदारसंघप्रमुख सचिन सावंत, युवा सेनेचे राजू राठोड, राज ू शेटये, बाबू आचरेकर, बबली राणे, लक्ष्मण तेली, रंजन राणे, दामू सावंत, संदीप सावंत, नंदू सावंत तसेच जानवली आणि कलमठ गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. 

कलमठ ग्रामस्थांशी संवाद साधताना खा.विनायक राऊत यांनी हायवे चौपदरीकरात कुणावरही अन्याय होणार नाही. तरंदळे फाटा येथे ग्रामस्थांच्या मागणीनुसार अंडरपास होईल. त्याला मंजुरी मिळाली आहे. कार्यकारी अभियंता प्रमोद बनगोसावी यांनी अंडरपासच्या मागणीबाबत सकारात्मकता दर्शवत याबाबतचा प्रस्ताव दिल्ली येथे पाठविण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे आता प्रत्यक्षात काय कार्यवाही होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. भाजप नेते संदेश पारकर, युवा सेनेचे राजू राठोड आदींनी तरंदळे फाटा येथे यापूर्वीही अंडरपास देण्याबाबत मागणी केली होती.

दरम्यान जानवली येथील मारूती मंदिर येथे खा.राऊत यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी नागरीकांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. रंजन राणे यांनी हायवेची हद्द सतत बदलत आहे. संयुक्त मोजणीत लाल रेषेप्रमाणे 45 मीटरची हद्द निश्‍चित करण्यात आली होती. त्याच्या पश्‍चिमेच्या दिशेने दहा फुटाने बाहेर जात ही हद्द एजन्सीकडून वाढविली जात आहे. त्यामुळे मारूती मंदिरासह अनेक नागरीकांची घरे आणि बागायती बाधित होत आहेत याकडे खा.राऊत यांचे लक्ष वेधले. थ्रीडी प्रमाणे 45 मीटरचे जे भूसंपादन झाले आहे त्यातच काम व्हावे अशी मागणी केली. तसेच स्व.केशवराव राणे यांच्या बंगल्यासमोरून जाणार्‍या साकेडी फाटा येथे एसटीच्या गाड्यांची वाहतूक असते. तरंदळे फाटा ते साकेडीफाटा दरम्यान बॉक्सेल भिंत येणार आहे. त्यामुळे तेथे लगेच सर्कल देणे शक्य नाही. ही बाब लक्षात घेवून निधी हॉटेलपर्यंत दोन्ही बाजुने सर्व्हीस रोड द्यावे आणि तेथून या फाट्याकडे वळण्यासाठी सुविधा द्यावी अशी मागणी केली. यावेळी कार्यकारी अभियंता बनगोसावी यांनी सर्व्हे करून त्याबाबत निर्णय घेतला जाईल असे सांगितले.
 यावेळी खा. राऊत यांनी मारूती मंदिर बाधित होणार नाही याची आम्ही काळजी घेवू. तरंदळे फाटा येथे अंडरपास आणि मारूती मंदिर विस्थापित होवू न देणे या दोनच मागण्या मंजूर होतील, असे सांगितले.  

आपत्कालीन व्यवस्थापनासाठी पावसाळ्यात मॉनिटरींग टीम

कणकवली : प्रतिनिधी

कणकवली शहरामध्ये महामार्ग समस्यांबाबत दिलेली आश्‍वासने पावसाळ्यापूर्वी पूर्ण कली जातील. पावसाळ्यासाठी कणकवली व कुडाळ येथे आपत्कालीन व्यवस्थापनासाठी दोन मॉनीटरींग टीम कार्यरत ठेवले जातील. येत्या पाच दिवसात शहरातील स्ट्रीट लाईट बसविण्याचे काम पूर्ण केले जाईल. 

दरम्यान, 27 मे रोजी शहरातील रस्त्यालगतचे अनधिकृत विक्रेते आणि मोबदला दिलेली बांधकामे हटविली जातील अशी ग्वाही महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता प्रमोद बनगोसावी यांनी कणकवली नगराध्यक्षांना दिली.

मंगळवारी सायंकाळी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी गांगोमंदिर नजीक प्रमोद बनगोसावी यांच्याशी शहरातील विविध प्रश्‍नांबाबत चर्चा केली. हायवेच्या समस्यांबाबत यापूर्वी आपले लक्ष वेधुनही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. केवळ आश्‍वासने नकोत त्याची पुर्तता कधी करणार? नागरीकांच्या रोषाला आम्हाला सामोरे जावे लागत आहे. आश्‍वासने देवुनही तुम्ही आतापर्यंत कामे मार्गी लावलेली नाहीत. आज शहरामध्ये सातत्याने वाहतूक कोंडी भेडसावत आहे. रस्त्यावर विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यांना हटविण्याची कार्यवाही तातडीने करा. सर्व्हीस रोडचे काम दोन्ही बाजुने पूर्ण करा. ज्या जमीन मालक, गाळेधारकांना नोटीस दिल्या नाहीत त्यांना नोटीसा देत सर्व्हीस रोडची कामे करा. नगरपंचायतीची या कामांसाठी काही मदत लागल्यास ती देवू, पण पावसाळ्यात जनतेला कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्या अशी मागणी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी कार्यकारी अभियंता श्री.बनगोसावी यांना केली. तर नैसर्गिक पाण्याचे प्रवाह मोकळे केले नाहीत तर शहरात पावसाळ्यात शहरामध्ये पाणी भरणार आहे. यामुळे जनतेचा रोष सर्वांनाच सहन करावा लागेल असा इशारा नगरसेवक अबिद नाईक यांनी दिला. यावर श्री. बनगोसावी यांनी पावसाळ्यात कणकवलीत आपत्कालीन स्थितीत कोणत्याही समस्या निर्माण झाल्यास एक पोकलॅन, मॉनीटरींग टीम, एक टीपर व व्हॅन कार्यरत असणार आहे. अ‍ॅड. उमेश सावंत यांच्या घराजवळील नाला, निखिल हॉटेलजवळील नाला, उबाळे मेडिकल जवळीत सांडपाणी, गांगोमंदिरकडी मोरीचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही दिलीप बिल्डकॉनचे रवीकुमार यांनी दिली. फुल्या मारलेल्या बाधित इमारती हटविलेल्या नसल्याने पावसाळ्यात धोकादायक स्थिती निर्माण होवू शकते. वाहतुकीवर त्याचा परिणाम होवू शकतो याकडे नगराध्यक्षांनी लक्ष वेधले. त्याबाबत पावसाळ्यापूर्वी कार्यवाहीची ग्वाही श्री.बनगोसावी यांनी दिली. स्ट्रीटलाईटसाठी एलईडी ब्रॅकेटस् आली असून गटार व सर्व्हीस रोडचे काम येत्या चार दिवसात पूर्ण केल्यानंतर तातडीने स्ट्रीट लाईट बसविण्यात येणार असल्याचे दिलीप बिल्डकॉनचे श्री. गौतम यांनी सांगितले. यावेळी विविध मुद्यांवर चर्चा  झाली. गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक अबिद नाईक, बंडू गांगण, कनिष्ट अभियंता डी. आर. गाडेकर, शाखा अभियंता गणेश महाजन, अभय राणे आदी उपस्थित होते.