होमपेज › Konkan › अणुस्कुरा घाट असुरक्षितच

अणुस्कुरा घाट असुरक्षितच

Published On: Aug 04 2018 10:55PM | Last Updated: Aug 04 2018 10:29PMराजापूर : प्रतिनिधी

गेल्या अनेक वर्षांमध्ये कोट्यवधी रुपये खर्च होऊनही अणुस्कुरा घाट हा अजूनही असुरक्षित असल्याचे नुकत्याच घाटात तीन ठिकाणी  कोसळलेल्या  दरडींवरुन स्पष्ट झाले आहे. उंचच्या उंच कडे सतत घसरणारी ठिसूळ माती व विचित्र वळणे यामुळे कोकण व पश्‍चिम महाराष्ट्र यांना जोडणार्‍या या घाटाच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे .

राजापूर तालुक्यातून कोल्हापूरकडे जाण्यासाठी लगतचा असा मार्ग म्हणून अणुस्कुरा घाटाची ओळख असून स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अनेक वर्षे या घाटाचे खोदकाम सुरु होते. प्रदीर्घ कालखंडानंतर सन  2001 साली तत्कालीन बांधकाम मंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याहस्ते अणुस्कुरा घाटाचे उद्घाटन होऊन वाहतुकीसाठी घाटरस्ता खुला झाला होता. त्यानंतर गेल्या दोन दशकांच्या कालखंडात या घाटातून एसटीसह विविध प्रकारची वाहतूक सुरु असून कमी वेळात राजापूरवरुन कोल्हापूरचा प्रवास करणे शक्य झाले आहे.  मात्र, या घाटात अधून-मधून कोसळणार्‍या दरडी या वाहतुकीला  धोकादायक ठरत आहेत. 

गेल्या काही वर्षांत दरडी कोसळून मातीचे ढिगारेच्या ढिगारे रस्त्यावर पडून संपूर्ण वाहतूक बंद पडण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. मुळात या घाटाची रचना अत्यंत विचित्र अशी आहे.  येथे नागमोडी वळणे असून अती उंचीचे कडे आहेत. येथील माती ठिसूळ आहे. अधुनमधून माती खाली सरकताना दिसते. त्यामुळे घाटाची सुरक्षा राखताना संबंधित बांधकाम विभागाला मोठे आव्हान असते.
यापूर्वी बांधकाम विभागाकडून घाटात अनेक संभाव्य ठिकाणी पक्क्या स्वरुपात संरक्षक भिंती बांधण्यात आल्या होत्या. पण बर्‍याच वेळा त्या भिंतीही कोसळलेल्या दरडींच्या ढिगार्‍या खाली गाडल्या गेल्याचे पहावयास मिळाले. नुकत्याच कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे घाटात तीन ठिकाणी दरडी कोसळून संपूर्ण वाहतूक बंद पडली होती. आजवर सुदैवाने कोसळलेल्या ढिगार्‍यापासून जीवित किंवा वित्त हानी झाली नसली  तरी अणुस्कुरा घाटाच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. 

गेल्या काही वर्षांत घाटातील रुंदीकरण, साईडपट्ट्या, मोर्‍या, नव्याने डांबरीकरण अशा कामांसाठी कोट्यवधी रुपये खर्ची पडले आहेत. पण तरीदेखील या घाटाची सुरक्षितता ज्या प्रमाणात अपेक्षित आहे, तेवढी राहिलेली नाही हेच दिसून आले आहे. राजापूर तालुक्यातून कोल्हापूर जिल्ह्याकडे व पर्यायाने त्यापुढे जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे पण अणुस्कुरा घाटाच्या विचित्र रचनेमुळे व  कोसळणार्‍या दरडींमुळे  सर्वांना सोयीस्कर ठरेल, असा हा घाट केव्हा सुरक्षित होईल, येथे कोसळणार्‍या दरडी कशा रोखल्या जातील, असा सवाल उपस्थित केला जात आहे.