होमपेज › Konkan › ‘आरटीई’ प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

‘आरटीई’ प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

Published On: Feb 12 2019 1:06AM | Last Updated: Feb 12 2019 1:06AM
रत्नागिरी : प्रतिनिधी

शिक्षण हक्‍क कायद्यानुसार 25 टक्के राखीव जागांवरील म्हणजेच ‘आरटीई’च्या प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. यानुसार 8 ते 23 फेब्रुवारीदरम्यान आरटीई प्रवेशासाठी ऑटो फॉरवर्ड केलेल्या शाळा आणि नव्याने नोंदणी केलेल्या शाळांची पडताळणी होणार आहे. त्यानंतर 25 फेब्रुवारी ते 11 मार्चदरम्यान पालकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे.

राज्यातील इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळांमधील पहिलीच्या प्रवेशाच्या 25 टक्के जागा मागासवर्गीय तसेच आर्थिक दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवले जातात. या जागांवर प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण हक्‍क कायद्यानुसार मोफत शिक्षण दिले जाते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पुस्तके, गणवेश आणि इतर साहित्य शाळेने नि:शुल्क देणे कायद्याने बंधनकारक आहे. शाळेपासून 1 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर राहत असलेल्या पालकांच्या पाल्यांना प्रवेशासाठी प्राधान्य दिले जाते. पहिल्या फेरीत 1 किलोमीटरच्या आत राहणार्‍या विद्यार्थ्यांचा, त्यानंतर त्यापेक्षा दूर राहणार्‍या विद्यार्थ्यांचा प्रवेश प्रक्रियेत विचार केला जातो.

‘आरटीई’ प्रवेश देण्यास पात्र असलेल्या शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या जागांची नोंदणी व त्याचे शिक्षण विभागाकडून पडताळणी करण्याची प्रक्रिया 8 ते 22 फेब्रुवारी या कालावधीमध्ये करण्यात येत आहे. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातील शाळानिहाय उपलब्ध असलेल्या जागांची आकडेवारी जाहीर केली जाईल. त्यानंतर 25 फेब्रुवारी ते 11 मार्च या कालावधीमध्ये पालकांना ऑनलाइन अर्ज भरता येईल. आलेल्या या सर्व अर्जांमधून लॉटरी पद्धतीने 14 मार्च प्रवेशाची पहिली यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर शिल्लक राहिलेल्या जागांनुसार प्रवेशाची दुसरी व तिसरी यादी जाहीर केली जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, प्राथमिक शिक्षण संचलनालयाकडून ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यास विलंब होत असल्याने गेली काही वर्षे ‘आरटीई’ अंतर्गतच्या 25 टक्के राखीव जागा पूर्ण भरण्यात शिक्षण विभागाला सातत्याने अपयश आले आहे. मागील वर्षी जानेवारी महिन्यापासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली होती. यंदा प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यास विलंब झाल्याचे स्पष्ट होत आहे. ऑनलाइन माहिती भरताना झालेल्या चुका (जसे बालकाचे नावातील/आडनावातील किरकोळ चुका) गृहित धरून शाळांना प्रवेश नाकारता येणार नाही. पालकांनी कोणतेही कागदपत्र अपलोड करू नये. मात्र, उत्पन्नाचा दाखल्यावरील बारकोड खाली नमूद क्रमांक ऑनलाइन अर्जामध्ये नमूद करणे आवश्यक आहे.