Tue, Jul 23, 2019 11:48होमपेज › Konkan › शासनाचा ‘अन्‍नदिन’ नेमका कोणी साजरा करायचा?

शासनाचा ‘अन्‍नदिन’ नेमका कोणी साजरा करायचा?

Published On: Dec 11 2017 1:31AM | Last Updated: Dec 10 2017 8:57PM

बुकमार्क करा

मालवण : मंगेश नलावडे

दारिद्य्ररेषेखालील शिधापत्रिकाधारकास तीन महिन्यांचे आगाऊ धान्य घरपोच करण्याचे फर्मान शासनाने काढले होते. या योजनेचाही जिल्ह्यात सर्वत्र बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. याचबरोबर  शासनाने प्रत्येक महिन्यातील 7 तारखेला अन्‍नदिन साजरा करण्याचे व या दिवशी रात्री आठ वा. पर्यंत धान्य दुकान सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील  परिस्थिती विचारात घेता रात्री आठ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवणे  दुकानदारांना शक्य नाही.  तसेच हा अन्‍नदिन नेमका कोणी साजरा करायचा?असा प्रश्‍न धान्य दुकानदारांना पडला आहे.

जिल्ह्यातील रास्त धान्य दुकानदारांनी ई-रजिस्टर, संदर्भ रजिस्टर अद्ययावत करून ती पुरवठा विभागास सादर करताना चुकीच्या माहितीचा डाटा ई-पॉस मशीनमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. ही चुकीची माहिती समाविष्ट करणार्‍यांवर कारवाई होणार का? हा प्रश्‍न आहे.जिल्ह्यातील बर्‍याच शिधापत्रिकाधारकांना अद्याप 12 डिजिटल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत.त्यामुळे हे सर्व शिधापत्रिकाधारक धान्यापासून वंचित राहण्याची शक्यता  आहे. 

अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना बसणार फटका

परित्यक्‍ता, विधवा, विनाआधार व्यक्‍तींना शासनाच्या अंत्योदय योजनेतून धान्य पुरवठा केला जातो.मात्र शासनाच्या नव्या धोरणाचा आता या लाभार्थ्यांना फटका बसणार आहे.अंत्योदय शिधापत्रिकेत दोन सदस्य असलेल्यांची नावे आता अन्‍नसुरक्षा योजनेत टाकली जाणार असल्याने या ग्राहकांवर अन्याय होण्याची शक्यता आहे.ज्या सदस्यांची संख्या दोनपेक्षा जास्त आहे,त्यांनाच अंत्योदय योजनेचा धान्य पुरवठा होणार आहे.प्रत्यक्षात अंत्योदयमधील दोन व्यक्‍तींचा अन्‍नसुरक्षा योजनेत समावेश केल्यास मिळणारे धान्य हे फारच अत्यंल्प असल्याने संबंधितांना उपासमारीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

...तर वाहतूक खर्च द्या

रास्त धान्य दुकानदारांना त्यांच्या दुकानापर्यंत शासनाने धान्य पुरवठा करणे आवश्यक आहे.अन्य जिल्ह्यात शासनाच्यावतीने ही सुविधा दिली जात आहे. धान्य दुकानदार संघटनेच्यावतीने वेळोवेळी आवाज उठविला. मात्र यात ग्रामीण भागाचा विचार करता,असे धान्य पुरवठा करण्याची निविदाच ठेकेदाराकडून भरली जात नसल्याचे कारण पुरवठा विभागाने पुढे केले आहे.दुकानापर्यंत धान्य पुरविता येत नसेल तर वाहतुकीसाठी होणारा खर्च तरी द्यावा,अशी मागणी केली आहे.