Thu, May 23, 2019 21:17
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › संतांच्या अभंगांनी मराठी भाषा जागतिक स्तरावर : नेवाळकर

संतांच्या अभंगांनी मराठी भाषा जागतिक स्तरावर : नेवाळकर

Published On: Mar 05 2018 8:51PM | Last Updated: Mar 05 2018 8:19PMकासार्डे  : वार्ताहर

मराठी मातृभाषा ही भारतातील एक ऐतिहासिक समृध्द भाषा म्हणून बोलली जाते. अशा मराठी भाषेला ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. 11 व्या शतकात मुकुंद राजांनी पहिला मराठी आद्य ग्रंथ लिहिला. ज्ञानेश्‍वर माउलींनी मराठी भाषा समृध्द केली. संतांच्या अभंगांनी मराठी भाषा जागतिक स्तरावर पोहोचवली. असे सांगतानाच इंग्रजी भाषेच्या संक्रमणामुळे मराठी भाषा संकटात सापडली असल्याचे मत लोकमंगल प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल नेवाळकर यांनी व्यक्त केले. 

तळेरे येथील स्व. सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालय व स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्‍त विद्यमाने मराठी भाषा दिनानिमित्त मराठी भाषेचे महत्त्व या विषयावर अनिल नेवाळकर यांचे व्याख्यान तळेरे येथील डॉ. एम. डी. देसाई सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित करण्यात आले होते. याचे उद्घाटन नेवाळकर यांच्या हस्ते झाले. सुरेश ताम्हाणे, राजन पाटोळे, मुख्याध्यापक सी. के. कोरे, स्व. सुनील तळेकर चरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश तळेकर, वाचनालयाचे अध्यक्ष अशोक मुद्राळे, अंकुश कदम, राधिका खटावकर, उदय दुदवडकर, विठ्ठल जाधव, राहुल गोडबोले, हेमंत महाडिक, विशाल भोसले, गौरवी लाड, ऋचा मुणगेकर, रघुनाथ सावंत आदी उपस्थित होते. 

नेवाळकर म्हणाले, मराठी भाषिकांनी निरनिराळ्या क्षेत्रात गेले पाहिजे. नुसते ग्रंथ वाचून मोठे होता येत नाही. ग्रंथाचा आणि साहित्याचा अनुभवदेखील घेता आला पाहिजे.  मराठी भाषेने आपल्यासाठी काय केले असा विचार न करता मराठी भाषा कशी समृध्द करता येईल, याचा विचार करायला आपण शिकले पाहिजे. महाराष्ट्रात होऊन गेलेल्या तत्कालीन संतांसाठी कोणतेही विद्यापीठ नव्हते तरीसुद्धा त्यांनी भक्‍ती आणि सृष्टी निर्मितीचे अभंगातून मांडलेले तत्वज्ञान चिरकाल टिकून आहे. यासाठी मराठी बोलण्याचा कमीपणा कोणीही बाळगू नये,असे मार्गदर्शनात्मक प्रतिपादन नेवाळकर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक मुद्राळे, सूत्रसंचालन व आभार अंकुश कदम यांनी मानले.