होमपेज › Konkan › अनिल देसाई राज्यसभेवर; कोकणात आनंद

अनिल देसाई राज्यसभेवर; कोकणात आनंद

Published On: Mar 18 2018 1:07AM | Last Updated: Mar 17 2018 10:43PMचिपळूण : प्रमोद पेडणेकर

शिवसेनेचे सचिव अनिल देसाई दुसर्‍यांदा राज्यभेवर निवडून आल्याने कोकणात आनंद व उत्साहाचे वातावरण आहे. गेली पाच वर्षे राज्यसभेत कष्टकरी, कामगारांच्या प्रश्‍नांसह राज्य व राष्ट्रीय स्तरावरील मुद्यांवरील चर्चेत देसाई यांचा वावर प्रभावी ठरला होता. पुन्हा एकदा राज्यसभेत देसाई महाराष्ट्रातून बिनविरोध आल्याने सेनेचा आवाज बुलंद ठरणार आहे.

विमा कंपनीत अधिकारी असलेले अनिल देसाई शिवसेनेच्या व बाळासाहेबांच्या प्रभावाखाली भगव्या झेंड्याशी जोडले गेले. उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांचे उत्तम सूत जमले आणि सेनेच्या संघटन व्यवस्थापनात अनिल देसाईंनी मग अनेक जबाबदार्‍या हातावेगळ्या केल्या. शिवसेनेचे मुख्यालय असलेले सेना भवनात महाराष्ट्रभरातून येणार्‍या शिवसैनिकांना अनिल देसाईंचे सहकार्य व मार्गदर्शन कायम मिळत होते. संघटनेला त्यांनी एक शिस्त दिली. प्रशासकीय स्तरावरही शिवसेनेला त्यांनी जोडले. शिवसैनिक तसा रांगडा कार्यकर्ता. परंतु, या शिवसैनिकाला व सेनेच्या विविध नेत्यांना विधीमंडळ, संसदेत व प्रशासकीय कार्यालयात कशा भूमिका पार पाडायच्या याचा वस्तूपाठ अनिल देसाई यांच्याच कार्यशैलीने मिळाला असे बोलले जाते.

राज्यसभेतील त्यांचा सहा वर्षांचा कालखंड शिवसेनेसाठी गौरवास्पद तर कामगार, कष्टकर्‍यांसाठी उत्साहवर्धकच राहिला. अनेक चर्चेत त्यांनी भाग घेतला. विमा कामगारांवर ते सातत्याने बोलत राहिले. एकवेळ त्यांना केंद्रात अर्थ राज्यमंत्रिपदाची संधीही मिळाली होती. परंतु, संघटनात्मक अस्मितेच्या पुढे त्यांनी मंत्रिपद नाकारले व दिल्लीच्या विमानतळावरूनच ते महाराष्ट्रात परतले. मुंबई विमानतळावर शिवसैनिकांनी त्यांचे केलेले अभूतपूर्व स्वागत संघटनेत त्यांचा खोलवर असलेला प्रभाव दाखवतो. गेली वीस वर्षे त्यांच्याकडे शिवसेनेच्या सचिव पदासह अनेक जबाबदार्‍या आहेत. उद्धव ठाकरेंशी त्यांचा असलेला दोस्ताना व ‘मातोश्री’ची मर्जी या बरोबरच अनिल देसाईंची शिवसेनेशी असलेली निष्ठा तेवढीच तोलामोलाची समजली जाते. संघटनेच्या अनेक कठीण कालखंडात शिवसेनेच्या ‘थिंक टँक’मध्ये त्यांना मानाचे स्थान राहिले आहे.

शिवसेनेचा हा निष्ठावंत चेहरा पुन्हा एकदा राज्यसभेवर जात असल्याने शिवसैनिकांत विशेषत: कोकणात आनंद आहे. चिपळूण तालुक्याशी त्यांचा विशेष स्नेह होता. कोकणातील अनेक कामांसाठी त्यांनी आपला खासदार निधी उपलब्ध करून दिला आहे. चिपळूण दसपटी येथील रामवरदायिनी यात्रेलाही त्यांनी हजेरी लावली आहे. उत्तम वक्‍ता, निगर्वी चेहरा, शिवसेनेशी कमालीची निष्ठा व महाराष्ट्रभरातून येणार्‍या शिवसैनिकांशी सातत्याने असलेला लोकसंपर्क यामुळे अनिल देसाई यांचे शिवसेनेतील स्थान अधोरेखित झाले आहे.

URL : Anil Desai,  Rajya Sabha, Joy, konkan, konkan news