Sun, Jun 16, 2019 12:11
    ब्रेकिंग    



होमपेज › Konkan › ‘स्वाभिमान’चे दान तटकरेंच्या पारड्यात?

‘स्वाभिमान’चे दान तटकरेंच्या पारड्यात?

Published On: May 09 2018 2:04AM | Last Updated: May 08 2018 10:50PM



चिपळूण : खास प्रतिनिधी

कोकण स्थानिक स्वराज्य संस्थांची विधान परिषदेची निवडणूक रंगतदार अवस्थेत आली असून शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा सरळ सामना आहे. सेनेने अ‍ॅड. राजीव साबळे, तर राष्ट्रवादीने नेते सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीत भाजपचा उमेदवार नसल्याने ‘महाराष्ट्र स्वाभिमान’चे दान कुणाला हा प्रश्‍न आहे. सद्य:स्थितीत आ. तटकरे यांनी आपण खा. नारायण राणे यांच्याशी बोलणे झाल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ‘स्वाभिमान’चा कल स्पष्ट होत आहे.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था सदस्य आमदार निवडून देणार आहेत. 20 मे रोजी त्यासाठी मतदान होत असून शिवसेना विरोधात राष्ट्रवादी अशी काँटे की टक्‍कर आहे. खा. नारायण राणे यांनी या आधीच शिवसेनेला ही निवडणूक जिंकू देणार नाही, असे जाहीर केले आहे. त्यामुळे ‘स्वाभिमान’चे दान तटकरेंच्या पारड्यात पडणार असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे.

दरम्यान, या निवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांनी नुकतीच खा. राणे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी खा. राणे यांनी त्यांना विजयाचा कानमंत्र दिला आहे. रायगड जिल्ह्याच्या खासगी दौर्‍यात खा. राणे असताना अनिकेत तटकरे यांनी त्यांचा आशीर्वाद घेतला. यावेळी त्यांच्यामध्ये निवडणुकीबाबतही चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. खा. राणे व तटकरे कुटुंबियांचे पूर्वांपार कौटुंबिक ऋणानुबंध आहेत. त्यामुळे यावेळीही ‘स्वाभिमान’चे दान तटकरेंच्या पारड्यात पडणार आहे, असा अंदाज राजकीय वर्तुळात बांधला जात आहे.

या मतदारसंघात एकूण 941 मतदार आहेत. विजयी उमेदवाराला 471 चा आकडा पार करावा लागणार आहे. सर्वाधिक मतदार रायगड जिल्ह्यातील आहेत. राष्ट्रवादीने काँग्रेस, शेकाप, मनसे अशी आघाडी केली आहे. दुसर्‍या बाजूला शिवसेनेने उमेदवार दिला आहे. राज्यात सेना-भाजप सत्तेत असली तरी पक्षप्रमुख सातत्याने स्वबळाची भाषा करीत आहेत. त्यामुळे युतीमध्ये आलबेल नाही. दुसर्‍या बाजूला सेना उमेदवाराला विजयी होऊ देणार नाही, असा पवित्रा खा. राणे यांनी घेतल्याने तटकरे यांना फायदा होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘स्वाभिमान’कडे मतांचा गठ्ठा आहे. हा तटकरेंच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे. या शिवाय भाजपची भूमिका स्पष्ट नसल्याने भाजपची अनेक मते राष्ट्रवादीकडे वळतील. भाजपच्या धोरणानुसार विधान परिषदेत सेनेचा एक आमदार वाढणार नाही याची खबरदारी भाजपतर्फे घेतली जाईल, अशी चर्चा आहे. त्यामुळे या वेळीही कोकण पदवीधर मतदारसंघात तटकरे हॅट्ट्रीक साधतील, असा अंदाज बांधला जात आहे.