Sun, Feb 17, 2019 09:08होमपेज › Konkan › संतप्‍त प्रवाशांनी मालगाडी रोखली

संतप्‍त प्रवाशांनी मालगाडी रोखली

Published On: May 07 2018 2:02AM | Last Updated: May 06 2018 11:24PMरत्नागिरी : प्रतिनिधी

दादर-रत्नागिरी-मडगाव ही पॅसेंजर गाडी ब्लॉक घेतल्यामुळे रत्नागिरीपर्यंतच चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला. यामुळे  याची कल्पना नसलेल्या व मडगावकडे जाणार्‍या प्रवाशांना याचा फटका बसला. यामुुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी रत्नागिरी स्थानकात मालगाडी रोखून धरल्यामुळे गोव्याकडे जाणार्‍या सर्व गाड्या खोळंबल्या होत्या.

दादरहून सुटणारी पॅसेंजर नियमितपने दादर ते मडगाव अशी सोडली जाते. परंतु, गोव्यात मांडवी ब्रिजचे काम सुरू असल्यामुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याची माहिती 2 दिवसांपूर्वी कोकण रेल्वेकडून जाहीर करण्यात आली होती. मात्र, शनिवारी दादरवरून पॅसंजर गाडीची तिकिटे मडगावपर्यंतची देण्यात आली. रत्नागिरीतून गाडी पुढे रद्द झाल्याची माहिती नसलेले सुमारे पाचशेहून अधिक प्रवासी या गाडीतून प्रवास करीत होते. रात्री 1 वाजता गाडी रत्नागिरीत आल्यावर ती पुढे मडगावला जाणार नाही, असे समजल्यावर प्रवासी संतापले.

त्यांनी  याबाबात स्टेशन मॅनेजरकडे विचारणा केली. मात्र त्यांनी प्रवाशांच्या प्रश्‍नावर तोडगा काढला नाही.  शेवटी संतापलेल्या सर्व प्रवाशांनी स्थानकावरील गोव्याकडे जाणार्‍या मालगडीपुढे ‘रेल रोको’ सुरु केला. अचानक शेकडो प्रवासी रुळावर उतरल्यामुळे रेल प्रशासनाचे धाबे दणाणले होते. रेल पोलिसांनी स्थानिक पोलिसांना पाचारण केले. कोकण रेल्वेचे विभागीय व्यस्थापक उपेंद्र शेंडे तसेच अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तब्बल तीन तास हा प्रकार सुरु होता. पर्यायी व्यवस्था करेपर्यंत आम्ही रुळावरुन बाजूला होणार नाही, असा पवित्र प्रवाशांनी घेतला होता.

या रेल रोकोमुळे गोव्याकडे जाणार्‍या सर्व गाड्या चिपळूण, संगमेश्‍वर स्थानकावर थांबवून ठेवल्या होत्या. सुट्टीसाठी हजारो चाकरमानी कोकणात येत असल्याने त्याची  यामुळे पंचाईत झाली होती. अखेर ओखा एक्स्प्रेससह मंडगावकडे जाणार्‍या गाडीतून त्या प्रवाशांना सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्यानंतर रेल रोको स्थगित करण्यात आला. यामुळे कोकणकन्या एक्स्प्रेससह सर्व गाड्या 1 तास उशिराने धावत होत्या.