Sun, Jul 21, 2019 01:28होमपेज › Konkan › रत्नागिरीतील राजरत्न प्रतिष्ठान ठरतेय मनोरूग्णांसाठी देवदूत!

रत्नागिरीतील राजरत्न प्रतिष्ठान ठरतेय मनोरूग्णांसाठी देवदूत!

Published On: Aug 17 2018 10:37PM | Last Updated: Aug 17 2018 8:23PMरत्नागिरी : भालचंद्र नाचणकर 

रत्नागिरीतील राजरत्न प्रतिष्ठान मनोरुग्णांचे देवदूत ठरत आहे. मृत्यूनंतर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणी हात-साथ देण्याच्या प्रेरणेतून प्रतिष्ठानचे सचिन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सहकार्‍यांनी मनोरुग्णांची सेवा करण्याचा विडा उचलला आहे. नाशिकच्या गोरख पाटील या मनोरुग्णाला बरे करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. आता दुसर्‍या मनोरुग्णाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रूग्णालयात दाखल करण्यापूर्वी मनोरुग्णाचे रूप आणि आताचे रूप यातील फरक पाहिल्यानंतर हे प्रतिष्ठान रत्नच असल्याचे स्पष्ट होत आहे.

चिपळुणातील एका कॉलेजसमोर आठवड्यापूर्वी अंगावर दुर्गंधीयुक्‍त मळलेले कपडे, दाढी वाढलेली अशा अवस्थेत एक मनोरुग्ण आढळून आला. त्यांना पूर्णपणे स्वच्छ करून उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या मनोरुग्णाची प्रकृती सुधारत असून ते सुधाकर असे आपले नाव असल्याचे सांगत आहेत. ते मूळचे केरळचे असल्याचेही सांगत असल्याचे प्रतिष्ठानचे सचिन शिंदे यांनी सांगितले. देवदूतासारख्या या कामात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रल्हाद देवकर यांच्यासह इतर वैद्यकीय अधिकार्‍यांची मोलाची मदत होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

नाशिकमधील गोरख पाटील (वय 33) नामक मनोरुग्ण काही दिवसांपूर्वी रेल्वे स्टेशनवर असल्याची माहिती मिळाली. लगेचच रेल्वे स्टेशनवर जाऊन 108 रुग्णवाहिकेने त्या मनोरुग्णाला रुग्णालयात दाखल केले. आठवडाभरात  उपचाराने त्यांची प्रकृती सुधारली. त्यानंतर त्यांनी नाव, गाव सांगितले. रुग्णाचे नातेवाईक आले आणि त्यांना घेऊन गेले. नाशिक पोलिसांकडे ते हरवल्याची तक्रार दाखल झाली होती. नातेवाईकांना गोरख पाटील मिळाल्यानंतर नाशिक पोलिसांनी आभार मानण्यासाठी मोबाईलवर संपर्क साधला. काही दिवसांपूर्वी तीन मनोरुग्ण महिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु,त्यांच्या आक्रमकपणामुळे अपेक्षित सहकार्य करता आले नाही, अशी खंत शिंदे यांनी व्यक्‍त केली.