Fri, Apr 26, 2019 17:53होमपेज › Konkan › भराडी देवी यात्रोत्सवासाठी आंगणेवाडीनगरी सज्ज!

भराडी देवी यात्रोत्सवासाठी आंगणेवाडीनगरी सज्ज!

Published On: Jan 26 2018 12:26AM | Last Updated: Jan 26 2018 1:22AMश्री क्षेत्र आंगणेवाडी : संतोष अपराज

मसुरे-आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी यात्रोत्सवासाठी आंगणेवाडीनगरी व जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. शनिवार 27 जानेवारी रोजी भराडी देवीच्या यात्रोत्सवास प्रारंभ होणार आहे. या यात्रेस लाखोचा जनसागर लोटणार आहे. भाविकांच्या स्वागतासाठी आंगणेवाडी ग्रामस्थ, महसूल व पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग सज्ज झाले आहेत.

भाविकांना सुलभ दर्शन मिळावे, यासाठी यावर्षी नऊ रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. आकर्षक विद्युत रोषणाई, परिसरात थाटलेली विविध प्रकारची दुकाने यामुळे आंगणेवाडी परिसर फुलून गेला आहे. यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हा पोलिस प्रशासन यंत्रणेने कडक पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.तर यात्रा यशस्वितेसाठी आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ व प्रशासकीय यंत्रणा अहोरात्र मेहनत घेत आहे. यावर्षी यात्रेत कृषी प्रदर्शन तसेच हालता देखावा, ड्रोन कॅमेर्‍याद्वारे यात्रेचे चित्रीकरण हे भाविकांचे खास आकर्षण असणार आहे.

देशभरात प्रसिद्ध असलेल्या या यात्रोत्सवाच्या नियोजनासाठी व तयारीसाठी गेले महिनाभर  आंगणेवाडी ग्रामस्थ व  जिल्हा प्रशासन कार्यरत आहेे. भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे यासाठी उड्डाण पुलासह नऊ रांगांची व्यवस्था  करण्यात आली आहे. तुलाभार सुलभ होण्यासाठी स्वतंत्र रांग ठेवण्यात आली असल्याने भाविकांना  नवस फेडणे सुलभ होणार आहे. 27 जानेवारी रोजी पहाटे 3 वा. पासून दर्शनाला सुरुवात होणार आहे.

आंगणेवाडी यात्रेसाठी जिल्ह्यात रेल्वे, खासगी, एसटी बसने चाकरमानी दाखल होण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे परिसरात वर्दळ वाढली आहे. यात्रेकरुंच्या वाहतुकीसाठी जिल्हा एस.टी. विभागाने विशेष नियोजन केले असून, जिल्ह्यातील सर्व आगारांतून तसेच महत्वाच्या पिकअप पॉइर्ंटवरुन यात्रेसाठी जादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.  शुक्रवार मध्यरात्रीपासून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. त्याचबरोबर परतीच्या प्रवासासाठी आरक्षणाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात्रा कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस यंत्रणाही सज्ज झाली आहे. पोलिस अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. शिवाय पोलिसांचे फिरते गस्ती पथकही कार्यरत राहणार आहे. याशिवाय महसूल, पंचायत समिती प्रशासनाच्यावतीनेही आरोग्य तसेच अन्य सोयी सुविधा भाविकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. 

यात्रोत्सवाची संधी साधत शिवसेना, भाजप, महाराष्ट्र स्वाभिमान आदी प्रमुख राजकीय पक्षांनी शहरांसह यात्रोत्सव मार्गांवरील विविध गावांमध्ये झेंडे, बॅनर्स  लावत जोरदार वातावरण निर्मिती केली आहे. राजकीय पक्षांनी विविध आरोग्य शिबिरे, क्रीडा स्पर्धा, सरबत वाटप आदी उपक्रमांचे आयोजन केले आहे.  या पक्षांनी भाविकांच्या स्वागतासाठी आपले कक्षही उभारले आहेत. 

अशी आहे  भराडी देवीच्या दर्शनाची वेळ  27  रोजी पहाटे 3 वा. पासून श्री भराडी देवीचे दर्शन व ओट्या भरण्यास प्रारंभ होणार आहे. रात्री 9 ते  11:30 या कालावधीत देवीला प्रसादाची ( ताटे)  लावण्याचा कार्यक्रम होणार आहे. या काळात दर्शनाच्या रांगा बंद करण्यात  येणार आहेत.  पुन्हा 12 वा. पासून रविवार 28 रोजी  सायंकाळी  5 वा. पर्यंत ओट्या भरण्याचा कार्यक्रम  होणार आहे. भाविकांना सुलभ व जलद दर्शन मिळण्यासाठी  नऊ रांगांची व्यवस्था  करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष नरेश आंगणे यांनी दिली.
 

राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन खास आकर्षण
 यात्रोत्सवात  यावर्षी प्रथमच सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने  राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे पाच ते सहा एकर जागेत होणार्‍या कृषी प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी कृषी अधिकारी शेळके, आयोजक संदीप गिड्डी, प्रकल्प अधिकारी विजय चव्हाण ,आ. वैभव नाईक, खा. विनायक राऊत व अधिकारी  मेहनत घेत आहेत. कृषी प्रदर्शनात मनोरंजनाचे कार्यक्रम होणार असल्याने भाविकांना आगळी-वेगळी मेजवानी ठरणार आहे. 
 

यात्रोत्सवासाठी प्रशासन सज्ज 
यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंगणेवाडी मंदिर परिसरात हॉटेल्स, मिठाई तसेच अन्य व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली आहेत. त्याचबरोबर बच्चे कंपनीचे आकर्षण ठरणारा आकाश पाळणा तसेच अन्य मनोरंजनाची दुकानेही थाटण्यात आली आहेत. आंगणेवाडी प्राथमिक शाळेनजीक मंडळाच्यावतीने साकारण्यात आलेला हालता देखावा भाविकांचे खास आकर्षण ठरणार आहे.महावितरणचे अधिकारी कर्मचारी, वीजमीटर जोडणीसाठी अहोरात्र प्रयत्न करत असून यात्रे दरम्यान वीज पुरवठा खंडित होणार नाही याची खबरदारी घेतली आहे. मसुरे ग्रामपंचायती च्या वतीने पिण्याच्या पाण्यासाठी विशेष व्यवस्था केली असल्याचे  सरपंच लक्ष्मी पेडणेकर व ग्रामविकास अधिकारी शंकर कोळसूलकर यांनी सांगितले.
 

 व्ही. आय. पी दर्शन मार्गात बदल.
 यावर्षी व्हीआयपी दर्शन मार्गात बदल करण्यात आला आहे. व्हीआयपीच्या दर्शना वेळी  भाविकांना त्रास होऊ नये.  याची खबरदारी घेण्यात येणार असल्याची माहिती आंगणेवाडी मंडळाचे अध्यक्ष नरेश आंगणे, व मुंबई आंगणेवाडी मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी दिली.  
 

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नियोजन
आंगणेवाडी कडे जाणार्‍या सर्व मागार्ंवर कुठेही  वाहतूक कोंडी होवू नये यासाठी पोलीस यंत्रणेने चोख नियोजन केले आहे. या सर्व मार्गांवर वाहतूक पोलिसाचे पथक कार्यरत असणार आहे. एसटी महामंडळ जिल्हा प्रशासन आरोग्य यंत्रणा,फायर ब्रिगेड या सर्वच विभागणी आपली व्यवस्था चोख ठेवली आहे.