रत्नागिरी : विशेष प्रतिनिधी
मोबाईल नंबरला आधार संलग्न केल्याचा फटका जिल्ह्यातील आशा आणि अंगणवाडी सेविकांना बसत आहे. एअरटेल कंपनीचे मोबाईल सिमकार्ड वापरणार्या या आशा आणि अंगणवाडी सेविकांचे मानधन चक्क एअरटेल बँकेत जमा होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. एअरटेल बँकेत अकाऊंट नसतानाही केवळ मोबाईल नंबर आधारकार्डशी लिंक केल्याने हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत तालुका आरोग्य विभागाकडे आशा स्वयंसेविकांकडून 2 तक्रारींही दाखल झाल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांर्तगत येणार्या आशा आणि शिक्षण विभागांतर्गत येणार्या अंगणवाडी सेविका यांचे मुळातच तुटपुंजे असणारे मानधन त्यांच्या खात्यात जमा होते. मात्र, जिल्ह्यातील काही आशा आणि अंगणवाडी सेविकांचे बँक खाते असतानाही त्यांच्या खात्यात मानधन न जमा होता ते परस्पर एअरटेल बँकेत जमा होत आहे. याचे कारण शोधण्याचा प्रयत्न पीडित कर्मचार्यांची केला असता आधार संलग्न झालेल्या एअरटेल मोबाईल क्रमांकामुळे हे मानधन एअरटेल बँकेत जमा झाल्याचे समजले.
एअरटेल बँकेच्या रत्नागिरीतील कार्यालयाशी पीडित आशा आणि अंगणवाडी सेविकांनी संपर्क साधला असता त्यांचे मानधन घेण्यासाठी उद्या या, परवा या असे सांगण्यात आले. शिवाय मानधन देताना ती रक्कमही पूर्ण दिली नसल्याचे आशा आणि अंगणवाडी सेविकांचे म्हणणे आहे. याबाबत काही अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परिषदेत तक्रार दिली असून यावर अजूनही उपाययोजना करण्यात आलेली नाही. याबाबत आशा कर्मचार्यांनी जि. प. आरोग्य विभागाकडे तक्रार केल्याची माहिती सुत्रांनी दिली. सध्या जि. प. आरोग्य विभागात दोन आशांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र, हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आशा आणि अंगणवाडी सेविकांचे मानधन एअरटेल बँकेत जमा होत असल्याबाबत मात्र कंपनीकडून एसएमएस पाठविण्यात येत नाहीत तर बाकी सगळे एसएमएस पाठविण्यात येत असल्याने एअरटेल बँकेबाबत आशा आणि अंगणवाडी सेविकांमध्ये विश्वासार्हता राहिलेली नाही. त्यामुळे या अजब प्रकाराबाबत तक्रार करायची कुणाकडे, या विवंचनेत आशा आणि अंगणवाडी सेविका आहे. त्यामुळे आधार लिंक करताना जोडलेला एअरटेलचा नंबर त्रासदायक ठरला आहे.