Thu, Jul 18, 2019 00:46होमपेज › Konkan › अणसूर-पाल नदीवरील पूल धोकादायक

अणसूर-पाल नदीवरील पूल धोकादायक

Published On: Jul 09 2018 1:03AM | Last Updated: Jul 08 2018 10:12PMवेंगुर्ले : प्रतिनिधी

वेंगुर्ले तालुक्यातील अणसूर-पाल येथील नदीवर असलेले सुमारे 45 वर्षांपूर्वीचे पूल धोकादायक झाले असून  अपघात होण्याची शक्यता आहे. या पुलामुळे अणसूर-पाल सहित मातोंड पंचक्रोशीतील गाव एकमेकांना जोडले असल्याने या पुलाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी मागणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली आहे. शुक्रवारी या पुलाची अधिकार्‍यांनी पाहणी केली.

वेंगुर्ले तालुक्यातील होडावडा, तुळस, मातोंड अणसूर-पाल, मोचेमाड या गावांमधून वाहणार्‍या मुख्य नदीवर अणसूर व पाल, मातोंड गावांना जोडणारे हे मुख्य पूल आहे. सद्यस्थितीत हे पूल पूर्णपणे धोकादायक झाले असून पूल पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. पुलावरून वाहने जाताना या पुलावरील स्लॅब हलत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले आहे. या पुलावरून अवजड वाहने गेल्यास मोठा अपघात होण्याचीही शक्यता आहे.

त्यामुळे ग्रामस्थांच्या मागणीनुसार याठिकाणी शुक्रवारी वेंगुर्ले तहसीलदार शरद गोसावी, नायब तहसीलदार शिंदे, जिल्हा परिषद बांधकाम उपअभियंता कांबळे, कनिष्ठ अभियंता कारेकर यांनी या पुलाची पाहणी करून हे पूल अवजड वाहनांसाठी तत्काळ बंद करण्यात आले व याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्‍वासन ग्रामस्थांना देण्यात आले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष बाळू देसाई, पाल सरपंच श्रीकांत मेस्त्री, अणसूर सरपंच अनविता गावडे, पाल ग्रा. पं. सदस्य सायंगो पालकर, विनोद चव्हाण, माजी उपसरपंच रामदास परब, सामाजिक कार्यकर्ते कमलेश गावडे, राजन गावडे, प्रसाद गावडे यांच्यासाहित अणसूर व पाल ग्रामस्थ उपस्थित होते.