Mon, Jun 17, 2019 03:17होमपेज › Konkan › आनंदवाडी प्रकल्पाचे काम पावसाळ्यापूर्वी होणार सुरू 

आनंदवाडी प्रकल्पाचे काम पावसाळ्यापूर्वी होणार सुरू 

Published On: Dec 17 2017 1:27AM | Last Updated: Dec 16 2017 10:28PM

बुकमार्क करा

देवगड : प्रतिनिधी

आनंदवाडी प्रकल्पाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले असून पावसाळ्यापूर्वी या प्रकल्पाचे काम सुरू करण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही खा.विनायक राऊत यांनी स्थानिक ग्रामस्थ व मच्छीमारांना दिली.

देवगड शासकीय विश्रामगृह येथे खा. विनायक राऊत यांनी आनंदवाडी प्रकल्पाबाबत स्थानिक ग्रामस्थ व मच्छीमारांशी संवाद साधून प्रकल्पाच्या सद्यस्थितीबाबत माहिती दिली. आनंदवाडी हा महत्वकांक्षी प्रकल्प केंद्र व राज्य शासनामार्फत संयुक्तपणे होत असून 2008 पासून रखडलेल्या प्रकल्पाला आता चालना मिळाली आहे. या प्रकल्पाबाबत आपण सातत्याने पाठपुरावा केला होता. या प्रकल्पाबाबत संबंधित मंत्र्यांनी 24 तासात मंजुरी दिली मात्र सचिव पातळीवर मंजुरी मिळण्यास 3 महिने लागले.

या प्रकल्पासाठी केंद्रशासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागामार्फत साडेबारा कोटी व सागरमाला योजनेअंतर्गत साडेबारा कोटी असे एकूण 25 कोटी मंजूर झाले आहे. प्रकल्पासाठी निधी, प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता मिळाली आहे. प्रकल्प मंजुरी कमिटीच्या अंतिम  मंजुरीनंतर निधी राज्यशासनाकडे वर्ग केला जाणार. प्रोजेक्ट सॅक्शन कमिटीची बैठक जानेवारीच्या पहिल्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये प्रकल्पाला मान्यता मिळाल्यानंतर प्रकल्पाचा विषय मार्गी लागेल. या सर्व प्रक्रियेला 4 ते 6 महिने जाणार असून टेंडर प्रक्रियेनंतर खर्‍या अर्थाने प्रकल्पाचा कामाला चालना मिळेल.पावसाळ्यापूर्वी प्रकल्पाचे काम सुरू होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे खा.राऊत यांनी सांगीतले.

मत्स्य व्यापारी प्रसाद पारकर यांनी वैयक्तिक मालकीची जागा प्रकल्पामध्ये जात असल्याचे सांगून ती जागा प्रकल्पामध्ये मिळावी,अशी मागणी केली. तर स्थानिक मच्छिमार नेते भाई खोबरेकर,चंद्रकांत पाळेकर  यांनी बंदरातील गाळ काढणेही महत्वाचे असून त्यासाठीही प्रयत्न करावे, अशी मागणी केली. शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर, कणकवली विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख शैलेश भोगले, युवा सेना जिल्हाप्रमुख अ‍ॅड.हर्षद गावडे, तालुकाप्रमुख मिलींद साटम, महिला तालुकाप्रमुख सौ.वर्षा पवार, देवगड शहरप्रमुख संतोष तारी, उपसभापती संजय देवरूखकर, नगरसेविका रोहीणी तोडणकर, लक्ष्मण तारी, मच्छिमार नेते भाई खोबरेकर, जगन्नाथ कोयंडे, चंद्रकांत पाळेकर, द्विजकांत कोयंडे, तुषार पाळेकर, प्रसाद पारकर, निशिकांत साटम,  विलास रूमडे, मिलींद कुबल आदी उपस्थित होते.