Sun, Dec 15, 2019 02:18होमपेज › Konkan › क्षेत्री खून प्रकरण : पुरुन ठेवलेली रिव्हॉल्व्हर पोलिसांकडून जप्‍त

क्षेत्री खून प्रकरण : पुरुन ठेवलेली रिव्हॉल्व्हर पोलिसांकडून जप्‍त

Published On: Jan 11 2019 1:18AM | Last Updated: Jan 11 2019 12:02AM
रत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

झाडगाव एमआयडीसीच्या शेट्येनगरात राहणार्‍या आनंद क्षेत्रीचा खून करण्यासाठी आरोपी किरण पंचकट्टीने वापरलेली रिव्हॉल्व्हर जप्‍त करण्यात आली. गयाळवाडीनजीकच्या शेट्ये-मलुष्टे नगरात पुरून ठेवलेली रिव्हॉल्व्हर तपास अधिकारी उपविभागीय  पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी आरोपीचा साथीदार लक्ष्मण शिंदे याला बोलते करून शोधून काढली.

आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादातून किरण पंचकट्टीने चुलत भाऊ आनंद क्षेत्री याचा गेल्या रविवारी गोळी घालून खून केला होता. हत्येसाठी वापरलेल्या रिव्हॉल्व्हरचा परवाना खून झालेल्या आनंदच्या नावे आहे. वर्षभरापूर्वीच शस्त्रपरवाना मिळाल्यानंतर लगेचच आनंदने नवीन रिव्हॉल्व्हर खरेदी केले होते. आर्थिक वादातून आनंदचा काटा काढण्यासाठी त्याच्याच घरात राहणार्‍या किरणने ते आदल्या दिवशी लंपास केले होते.

मृत्यू पावलेल्या आनंदने कर्नाटकात खून करून आलेल्या किरणला आसरा दिला होता. आरोपी किरणचे वडील बेळगावात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आहेत. आरोपीने आनंद क्षेत्रीकडून तीन लाख रुपये घेतले होते. त्याचबरोबर त्याच्या कारचा अपघात केला होता. कारच्या दुरुस्तीसाठी 1 लाख रूपये खर्च आला होता. किरणला मुद्रा कर्ज प्रकरण करून देऊन त्यातून किरणकडून येणे असणारी रक्‍कम काढून घेतली होती. अपघात विम्याची रक्‍कम मिळूनही पैसे परस्पर काढून घेतल्याने किरणने आसरा देणार्‍या आनंदचाच काटा काढला.

रविवारी रात्री पान खाऊन कारने येणार्‍या आनंदला थांबवून मागे बसलेल्या किरणने डोक्यात गोळी झाडली. ज्या रिव्हॉल्व्हरने गोळी घातली गेली ती रिव्हॉल्व्हर साथीदार आरोपी लक्ष्मण शिंदे याने गयाळवाडी येथे खड्डा काढून लपवून ठेवली होती. त्याला अटक करून उपविभागीय पोलिस अधिकारी इंगळे यांनी चौकशीत बोलते केले. त्यानुसार दुसर्‍या आरोपीने खड्डा काढून लपवून ठेवलेले रिव्हॉल्व्हर काढून दिले.