होमपेज › Konkan › माखजन पोलिस दूरक्षेत्राला मिळणार स्वतंत्र इमारत

माखजन पोलिस दूरक्षेत्राला मिळणार स्वतंत्र इमारत

Published On: Aug 17 2018 10:37PM | Last Updated: Aug 17 2018 8:25PMआरवली : वार्ताहर

माखजन येथील पोलिस दूरक्षेत्राच्या स्वतंत्र इमारत बांधकाम अंदाजपत्रकाला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. दूरक्षेत्र इमारत आणि पोलिस निवासस्थाने अशा इमारत बांधकामासाठी 55.19 लाख रुपये खर्च अपेक्षित असून याला कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी मंजुरी दिली असून कामाची निविदाही निघाली असल्याने आता लवकरच कामाला सुरुवात होण्याची शक्यता वाढली आहे.

बांधकामाला मंजुरी मिळून पाच वर्षे उलटली असताना निधीअभावी अद्याप बांधकामाला सुरुवात न झाल्याने भाड्याच्या खोलीतच ब्रिटिशकालापासून पोलिसांचा कारभार सुरु आहे. दूरक्षेत्रासाठी प्रशस्त इमारत नसल्याने पोलिस आणि कामकाजासाठी येणार्‍यांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. माखजन पोलिस दूरक्षेत्राची स्वतंत्र इमारत व्हावी, यासाठी गेली अनेक वर्षे कागदी घोडे नाचविण्यात येत होते.
संगमेश्‍वर पोलिस ठाण्याचे निरीक्षकांनी जिल्हा पोलिस यंत्रणेकडे पाठपुरावा केला. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी माखजन पोलिस दूरक्षेत्र बांधकामाचा प्रस्ताव अंदाजपत्रकासह शासन स्तरावर पाठविला. पोलिस महासंचालक कार्यालयाकडून आता माखजन पोलिस दूरक्षेत्र आणि पोलिस निवासस्थाने यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे जिल्हा पोलिस यंत्रणेला कळविण्यात आले. अंदाजपत्रकात चौकीसाठी प्रशस्त इमारत आणि पोलिस कर्मचार्‍यांसाठी चार शासकीय निवासस्थाने बांधण्याचे समाविष्ट करण्यात आले आहे. लवकरच या कामाचीही निविदा निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिस दूरक्षेत्राच्या इमारतीचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे.

सध्या असलेल्या पोलिस दूरक्षेत्राच्या जागेत खूप अडचण होत असल्याने पाच वर्षांपूर्वी माखजन येथीलच कुंभारवाडीजवळ शासकीय जागेत इमारत बांधण्याचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठविण्यात आला. इमारत बांधकामासाठी जागेचे सपाटीकरण करुन वृक्षारोपणही करण्यात आले. मात्र, गृह विभागाकडे इमारत बांधकामासाठी निधी नसल्याने बांधकाम रखडले होते.

तब्बल 27 गावांचे दूरक्षेत्र

या दूरक्षेत्रांतर्गत पुर्र्‍ये तर्फे संगमेश्‍वर, शिरंबे, कासे, कळंबुशी, नारडुवे, पेढांबे, असावे, माखजन, धामापूर, करजुवे, सरंद, बुरंबाड, आंबव, कोंडिवरे, आरवली, मुरडव, कुंभारखाणी खुर्द, मावळंगे, तुरळ, आंबेत, मुरडव, कुंभारखाणी, कुचांबे, कोंडभैरव, कुटगिरी, राजिवली, रातांबी या 27 गावांचा समावेश करण्यात आला आहे.