Wed, Jan 22, 2020 13:19होमपेज › Konkan › राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी अमित सामंत

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी अमित सामंत

Published On: Sep 11 2019 2:30AM | Last Updated: Sep 10 2019 10:09PM

अमित सामंतकुडाळ : प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी अमित सामंत यांची निवड प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली. जिल्हाध्यक्ष म्हणून पक्ष बळकटीसाठी तसेच पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी काम करावे, असा संदेश जयंत पाटील यांनी श्री. सामंत यांना या पत्राद्वारे दिला आहे. जिल्हा राष्ट्रवादीची सद्यस्थिती पहाता नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अमित सामंत पक्षाला कशी उभारी देतात याबाबत उत्सुकता आहेे. 

महिन्याभरापूर्वी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश गवस यांची तडकाफडकी   उचलबांगडी करत त्यांना प्रदेश प्रतिनिधी म्हणून नियुक्‍त करण्यात आले होते.  मात्र, या बदलामुळे  जिल्हा राष्ट्रवादीत शह-काटशाहाचे राजकारण निर्माण झाले. सुरेश गवस यांच्यासह जिल्हा राष्ट्रवादीच्या काही पदाधिकार्‍यांनी तर पदांचा राजीनामा देण्याचा इशारा दिला. यामुळे मुळात कमकुवत असलेल्या या पक्षाची जिल्ह्यातील अवस्था आणखी बिकट झाली. सध्या सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस नाजुक अवस्थेत आहे. विधानसभा निवडणूक जवळ आली तरी जिल्हाध्यक्ष जाहीर न केल्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. अखेर प्रदेशाध्यक्षांनी अमित सामंत यांना अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे.

नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी काँग्रेस पक्षाच्या एनएसयुआय संघटनेतून आपला राजकीय प्रवास सुरू केला. युवक काँग्रेसचे वॉर्ड अध्यक्ष त्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रायगड जिल्हा प्रभारी, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच 2014 च्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघाचे पक्ष निरीक्षक अशा महत्त्वाची पदांवर त्यांनी काम केले आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार कुटुंबीयांशी जवळचे म्हणून ओळखले जाणारे अमित सामंत जिल्हा राष्ट्रवादीला कसे उर्जितावस्थेत आणतात याबाबत औत्सुक्य आहे.