Thu, Jun 20, 2019 00:29होमपेज › Konkan › आंबोली हाऊसफुल्ल

आंबोली हाऊसफुल्ल

Published On: Jul 09 2018 1:03AM | Last Updated: Jul 09 2018 1:03AMआंबोली : वार्ताहर

जिल्ह्यात गेले चार दिवस कोसळणारा संततधार पाऊस, हवेत निर्माण झालेला गारवा, पाण्याच्या प्रवाहात वाढ झाल्याने फेसाळत कोसळणारे धबधबे अशा पावसाळी बेधुंद वातावरणामुळे रविवारी आंबोली वर्षा पर्यटकांनी फुलून गेली. देशभरातून आलेल्या या पर्यटकांमुळे आंबोलीत वर्षा पर्यटकांची जणू जत्राच फुलल्याचे भासत होते. मुख्य धबधब्यावर पर्यटकांनी गर्दी केल्याने घाटमार्गात अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली. चक्क आठ कि.मी.पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. दरम्यान, पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने पर्यटकांना शांततामय पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटता आला. 

मान्सूनच्या आगमनाबरोबरच आंबोलीचा वर्षा पर्यटन हंगामास प्रारंभ झाला तरी पावसाने दिलेली ओढ व टापूवर वनविभागाने घातलेले बंधारे यामुळे पर्यटकांचे  आकर्षण असलेले धबधबे प्रवाहीतच झाले नव्हते. परिणामी आंबोलीकडे वर्षा पर्यटकांनी पाठ फिरविल्याचे चित्र होते. मात्र, गेले चार दिवस संततधार पाऊस कोसळत असल्याने आंबोलीतील सर्वच धबधबे पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाले आहेत. यामुळे हा रविवार आंबोलीसाठी हाऊसफूल्ल ठरला. 

देशभरातील वर्षा पर्यटक आंबोलीत एकवटल्याचे पहावयास मिळाले. घाटमार्गातील मुख्य धबधब्यासह अन्य छोटे मोठे धबधबे तसेच परिसरातील सर्व पर्यटन स्थळे पर्यटकांनी गजबजून गेली होती. गावातील सर्व हॉटेल्स व लॉजींग बोर्डींग चक्क शुक्रवारपासूनच फुल्ल झाले होते. हिरण्यकेशी, कावळेसाद, महादेवगड या ठिकाणी पर्यटकांची विशेष गर्दी दिसत होती. जिल्ह्यासह कोल्हापूर, सांगली, बेळगाव, गोवा येथील पर्यटक रविवार सकाळपासूनच आंबोलीत दाखल झाले. सकाळी 9 वा. नंतर तर पर्यटकांची गर्दी वाढू लागली. दुपारच्या सुमारास हजारो पर्यटक मुख्य धबधब्यावर गोळा झाल्याने घाटमार्गातील वाहतूक अक्षरश: ठप्प झाली. आंबोली-जकातवाडी ते नानापाणी या टप्प्यात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. उपस्थित पोलिसांबरोबरच काही पर्यटकांनीही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न केले.

बंदोबस्तासाठी शेकडो पोलिस तैनात

रविवारी आंबोलीत वर्षा पर्यटकांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेवून जिल्हा पोलिस विभागाने बंदोबस्ताचे चोख नियोजन केले होते. सहा अधिकारी व 77 पोलिसांसह 15 होमगार्ड यासाठी तैनात करण्यात आले होते. सावंतवाडीचे पोलिस निरीक्षक सुनील धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक योगेश जाधव, वाहतूक शाखेचे निरीक्षक अविनाश भोसले आदींसह अन्य अधिकार्‍यांनी सर्वच पर्यटनस्थळांवर बंदोबस्त ठेवला होता. यामुळे रविवारचे वर्षा पर्यटन शांततेत पार पडले. 

स्थानिक व्यावसायिक सुखावले

आंबोलीचे मुख्य पर्यटन पावसाळी हंगामातच बहरते. यामुळे स्थानिक हॉटेल्स, लॉजिंग बोर्डिंग चालक, वाहतूक व्यावसायिक, स्टॉलधारक व अन्य छोट्या मोठ्या व्यावसायिकांसाठी हा सुगीचा हंगाम असतो. मात्र, गेले महिनाभर पर्यटकांची अपेक्षित गर्दी न झाल्याने हे व्यवसायिक हिरमुसले होते. मात्र रविवारी पर्यटकांची झालेली गर्दी पाहून हे व्यवसायिकही सुखावले. 

वाहनचालक व प्रवाशांना मन:स्ताप

पर्यटकांच्या विक्रमी गर्दीमुळे आंबोली घाटमार्गात झालेल्या वाहतूक कोंडीचा फटका या मार्गावरून प्रवास करणारे वाहनचालक व प्रवाशांना बसला. विक्रमी वाहतूक कोंडीमुळे हा घाटमार्ग पार करण्यासाठी वाहनांना तब्बल चार ते पाच तास लागत होते. यामुळे या मार्गावरून धावणार्‍या अनेक एसटी गाड्या प्रचंड विलंबाने धावत होत्या. यामुळे प्रवाशांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागला. यावर पर्याय म्हणून पावसाळी हंगामात दर रविवारी या मार्गावरील अवजड वाहतूक बंद ठेवण्याची मागणी पर्यटक व स्थानिकांमधून होत आहे. दरम्यान सायंकाळी 6 वा. नंतर पर्यटन स्थळांवर जाण्यास वनविभागाने बंदी घातली असून पोलिसांनीही पर्यटकांना तशा सूचना करत वेळीच माघारी परतण्याचे आवाहन केले.