Mon, Aug 19, 2019 09:23होमपेज › Konkan › आंबोली ग्रामस्थांचा जिल्हा रुग्णालयात ठिय्या; 

आंबोली ग्रामस्थांचा जिल्हा रुग्णालयात ठिय्या; 

Published On: May 12 2018 1:29AM | Last Updated: May 11 2018 10:44PMसिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी 

आंबोली-नांगरवाक धनगरवाडी रस्त्यावरील अतिक्रमण हटविताना आंबोली ग्रामपंचायत कर्मचारी व पोलिसांनी केलेल्या मारहाणीत जबर मार लागल्यानेच आपली आई सोनाबाई धोंडू पाटील (80) यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांचा मुलगा संजय पाटील याने केला आहे. याप्रकरणी जोपर्यंत मारहाण करणार्‍या कर्मचार्‍यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा आक्रमक झालेल्या आंबोली-नांगरवाक ग्रामस्थांनी देत जिल्हा रुग्णालय परिसरात ठिय्या आंदोलन केले. याप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेतली असता या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले असल्याचे आंबोली-धनगरवाडी ग्रामस्थानी सांगितले.

आंबोली-जकातवाडी सतीचीवाडी मुख्य रस्ता ते नांगरवाक-धनगरवाडी या रस्त्यावर पाटील यांनी अतिक्रमण केल्याने या रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी  नांगरवाक- धनगरवाडी ग्रामस्थांनी अनेकवेळा प्रशासनाचे लक्ष वेधले होते. तसेच उपोषणेही केली होती. तरीही अतिक्रमण हटविले न गेल्याने धनगरवाडी ग्रामस्थांनी 1 मेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. 4 दिवस उपोषण करूनही अतिक्रमण हटविले न गेल्याने पाचव्या दिवशी म्हणजेच शनिवारी 5 मे रोजी दुपारी 3 वा. पर्यंत अतिक्रमण हटविले न गेल्यास आंबोली ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा धनगरवाडी ग्रामस्थांनी दिला होता.

दरम्यान, अतिक्रमण हटविले नसल्याने संबंधित ग्रामपंचायतीला टाळे टोकण्यात आले होते. यानंतर प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात रस्त्यावरील अतिक्रमण हटविले होते. दरम्यान, हे अतिक्रमण हटविताना आपली आई सोनाबाई पाटील हिला आंबोली ग्रा. पं.चे  कर्मचारी व पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोप संजय पाटील यांनी केला. आईची तब्बेत खालावल्याने तिला आंबोली प्रा. आ. केंद्रात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर अधिक उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय व त्यानंतर जिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. सोनाबाई यांची स्थिती नाजूक असल्याने त्यांना गोवा येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात येणार होते. मात्र, गुरुवारी सायंकाळी 6 वा. च्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

संबंधित अतिक्रमण हटावा दरम्यान सोनाबाई यांना मारहाण झाल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा करत त्यांना मारहाण करणारे ग्रामपंचायत कर्मचारी व पोलिसांवर   मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा पाटील यांचे नातेवाईक आणि ग्रामस्थांनी घेत जिल्हा रुग्णालयाच्या शवगृहाजवळ ठिय्या आंदोलन केले. 

आंदोलनकर्त्यांची भूमिका पाहता शुक्रवारी सकाळी शवविच्छेदन होण्यापूर्वी मृतदेहावरील जखमांची पाहणी व त्याबाबतची नोंद करण्यासाठी कुडाळचे नायब तहसीलदार टी. एच. मठकर आणि अव्वल कारकून पी. बी. मांजरेकर हे जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र, आंदोलनकर्त्यांच्या भूमिकेमुळे त्यांना ताटकळत राहावे लागले. 

दुपारी कुडाळ रिक्षा चालक-मालक संघटनेचे राजन घाडीगावकर व त्यांच्या सहकार्‍यांनी संजय पाटील यांची भेट घेतली. या आंदोलनकर्त्यांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेत आपली कैफियत मांडली. यावेळी आपण संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करू, असे आश्‍वासन जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी दिले असल्याचे  सांगण्यात आले. 

या चर्चेमध्ये काही प्रमाणात समाधानी झालेल्या आंदोलनकर्त्यांनी शवविच्छेदन व अन्य प्रक्रिया पूर्ण करण्यास परवानगी दिली. मात्र, जोपर्यंत कारवाईबाबत लेखी आश्‍वासन मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याच्या निर्णयावर आंदोलनकर्ते ठाम आहेत.