Fri, Jul 19, 2019 07:14होमपेज › Konkan › आंबोली वर्षा पर्यटनास प्रारंभ

आंबोली वर्षा पर्यटनास प्रारंभ

Published On: Jun 10 2018 4:58PM | Last Updated: Jun 10 2018 5:18PMआंबोली : वार्ताहर

वर्षा पर्यटनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या निसर्गसुंदर आंबोलीमधील मुख्य धबधबा रविवारी प्रवाहित झाला. यामुळे आंबोलीच्या वर्षा पर्यटनाला खर्‍या अर्थाने प्रारंभ झाला. जिल्ह्यात सर्वत्र गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाचा जोर पाहता आंबोलीतील धबधबे प्रवाहित होणार या अंदाजाने अनेक हौशी पर्यटकांनी रविवारी सकाळी आंबोलीकडे धाव घेतली. अखेर दुपारी 11 वा. च्या सुमारास  आंबोली  घाटातील मुख्य धबधबा प्रवाहित झाल्याने पर्यटकांच्या उत्साहाला उधाण आले.

आता या पुढील प्रत्येक दिवस आंबोलीत वर्षा पर्यटकांची गर्दी होणार आहे. रविवार व सुट्टी दिवशी तर विक्रमी गर्दी होणार आहे. यंदा मुख्य धबधबा आठवडाभर लवकर प्रवाहित झाला आहे. आंबोलीच्या वर्षा पर्यटनास प्रारंभ झाल्याने स्थानिक व्यावसायिक आनंदित झाले आहेत. आणखी दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास मुख्य धबधबा तसेच घाटमार्गातील अन्य छोटे धबधबे पूर्ण क्षमतेने प्रवाहित होणार आहेत.

आंबोलीच्या वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी  देशभरातील पर्यटक गर्दी करत असतात. यामध्ये कुटुंबवत्सल पर्यटकांबरोबरच तरुणांचाही भरणा असतो. मात्र, काही मद्यपी पर्यटक धिंगाणा घालून या पर्यटनास गालबोट लावतात. त्याचबरोबर घाट रस्त्यावर होणार्‍या अनिर्बंध पार्किंगमुळे तासन्तास वाहतूक कोंडी होते. यातून अनेक वेळा वादावादीचे, छेडछाडीचे, मारामारीचे प्रकार उद्भवतात. या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी आंबोली ग्रा. पं. प्रशासन, जिल्हा पोलिस व वनविभागाच्या वतीने वर्षा पर्यटनाचे  नियोजन करण्यात येते. यावेळी गत वर्षांतील त्रुटी दूर करुन आंबोलीच्या वर्षा पर्यटनाचे वेळीच नियोजन होणे गरजेचे आहे.