Tue, Jul 16, 2019 01:40



होमपेज › Konkan › ‘आंबोली बूश फ्रॉग’ चा फोटो वाईल्डलाईफ फोटोग्राफीत अव्वल!

‘आंबोली बूश फ्रॉग’ चा फोटो वाईल्डलाईफ फोटोग्राफीत अव्वल!

Published On: Dec 03 2017 1:07AM | Last Updated: Dec 02 2017 8:50PM

बुकमार्क करा





आंबोली : वार्ताहर

आशिया खंडातील पाच हजारांहूनही अधिक उत्तमोत्तम छायाचित्रकारांच्या स्पर्धेत आंबोलीतील महादेव ऊर्फ काका भिसे यांनी  क्लिक केलेला ‘आंबोली बुश बेडकाचा’फोटो ‘वाईल्डलाईफ फोटोग्राफी’स्पर्धेत अव्वल ठरला आहे.त्यांच्या या फोटोमुळे जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर कोरले गेले आहे.

निसर्गाचे सौंदर्य आपल्या डोळ्यात साठवण्याचा अट्टाहास माणूस अगदी पूर्वीपासून करत आलाय. निसर्गातली कलाकुसर, विविध पैलूंची अनामिक वीण आणि त्यातून निर्माण होत असलेली अद्भूत चित्रे ही नेहमीच औत्सुक्याचा विषय ठरली आहेत. निसर्गातील हीच कला कॅमेर्‍याच्या लेन्समधून काका भिसे यांनी टिपत आंतरराष्ट्रीय स्तरावर सिंधुदुर्गाचे नाव पोहचविले आहे. ‘सेंच्युरी एशिया’ या प्रथितयश मासिकातर्फे ‘वाईल्डलाईफ फोटोग्राफी’ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.नुकत्याच द रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये पार पडलेल्या पारितोषिक वितरण समारंभात काक भिसे यांना सन्मानित करण्यात आले.आशिया खंडातील पाच हजाराहूनही अधिक छायाचित्रकारांनी या स्पर्धेत सहभाग दर्शवला होता.

‘आंबोली बुश’या बेडकाला एका कीटकांच्या लारवयांनी पकडलेले असल्याचा हा फोटो असून  कीटकांचा हा लारवा  बेडकांना भविष्यात बेडकांची संख्या कमी होण्यास कारणीभूत ठरू शकतो,असा शोधनिबंधही यावर लिहिण्यात आला.हा शोधनिबंध व काका भिसे यांनी काढलेला बेडकाचा फोटो या दोघांनाही हा मानाचा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा पुरस्कार प्राप्त झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.काका भिसे हे गेली चौदा वर्षे आंबोलीच्या निसर्ग संवर्धनासाठी झटत असून गेली तीन वर्षे ते वन्यप्राणी छायाचित्रणही करत आहेत. त्यांनी अशी असंख्य सुंदर वन्यप्राण्यांची छायाचित्रे आतापर्यंत टिपली आहेत. याच छायाचित्रणाच्या माध्यमातून त्यांनी आंबोलीच्या निसर्ग संवर्धनाचा विडाही उचलला आहे. त्यामुळे निसर्गाशी त्यांचे असलेले नाते हे खूपच विशेष आहे. 

गेल्या चौदा वर्षांत आपण अनेक आंतरराष्ट्रीय  छायाचित्रकारांबरोबर फिरून हा छंद जोपासला आहे.एवढ्या मोठ्या स्तरावर मिळालेल्या या यशामुळे मला अत्यानंद झाला असून अधिक चांगले फोटो काढण्याची उर्मी निर्माण झाली आहे.अशा शब्दात पुरस्कारानंतर काका भिसे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.