Tue, Mar 26, 2019 02:11होमपेज › Konkan › आंबेनळी घाट दुर्घटनेने घाट रस्त्यांची सुरक्षितता ऐरणीवर!

आंबेनळी घाट दुर्घटनेने घाट रस्त्यांची सुरक्षितता ऐरणीवर!

Published On: Jul 31 2018 2:01AM | Last Updated: Jul 31 2018 1:49AMसिंधुदुर्ग : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटात झालेल्या भीषण दुर्घटनेत दापोली कृषी विद्यापीठाचे 33 कर्मचारी मृत्युमुखी पडले. या अनपेक्षित घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या दुर्घटनेमुळ राज्यातील सर्वच घाट रस्त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी  राज्यातील घाटमार्ग सुरक्षित बनवणे गरजेचे आहे.

ड्रोन कॅमेर्‍यातून टिपलेली आंबेनळी घाटाची प्रत्यक्ष भौगोलिक रचना पाहिली असता तब्बल तीन-चारशे फूट टेकडीपर्यंत केवळ झुडपाव्यतिरीक्‍त एकही मोठा वृक्ष द‍ृष्टीस पडत नाही. अपघातग्रस्त वाहनाचे झालेले तुकडे आणि पर्यटकांच्या मृतांचे खच त्याच टप्प्यात दिसतात. त्याच्या खाली पुन्हा खोल दरी असून तो भाग मात्र घनदाट वृक्षांनी आच्छादलेला दिसतोे. जर हीच वृक्षांची मालिका घाटरस्त्यापासून सुरू झाली असली तर मृतांची संख्या निश्‍चित घटली असती. पण दरीच्या बाजूने कोसळणार्‍या गाडीला अडवण्यास कोणताच आधार नसल्याने या दुर्घटनेची भीषणता वाढली आहे. आंबेनळीघाटा प्रमाणेच सह्याद्रीतील बहुतांशी घाटात दरीच्या बाजूने नाममात्र सरंक्षक कठडे बांधलेले दिसतात. त्यांचा उपयोग केवळ दरीची सीमारेषा दर्शवण्यासाठी होतो. हे कठडे अपघात प्रसंगी कुचकामी  ठरतात .

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीसह फोंडाघाटासारखे घाट प्रवासासाठी सुरक्षित मानले जातात. याचे कारण म्हणजे केवळ माथ्या लगतचा टापू वगळता 90 टक्के घाटात सरंक्षण कठड्याला समांतर मोठमोठ्या वृक्षांच्या मालिका सैनिकाप्रमाणे उभ्या आहेत. बर्‍याच वेळेला वाहने कठडा तोडून दरीत कोसळण्याचा धोका निर्माण झाला होता. पण झाडांनी त्या वाहनांना दरीत लोटू दिले नाही. अर्थांत या झाडांनी शेकडो प्रवाशांना जीवदान दिले आहे. 

मोठे वृक्ष जमिनीच्या वर 50-60 फूट असतील तर त्यांची मुळे जमिनीच्या पोटात 20-30 फुटांपर्यंत गेलेली असतात. शिवाय झाडांची मुळे एकमेकांचे हात पकडावीत, तशी एकमेकात गुरफटलेली असतात. वाहनाच्या एका झाडाला धक्‍का बसला तरी ते कोलमडून पडत नाही. कारण इतर झाडांच्या मुळांनी त्याला घट्ट पकडलेले असते. पर्यावरणाच्या समतोलाची भूमिका बजावत ही झाडे माणसांची अपघात प्रसंगी जीवितहानीही रोखतात. त्सुनामी लाटांची नैसर्गिक आपत्ती आली तेव्हा ज्या समुद्र काठाला लागून खारफुटी वृक्षांची लागवड होती त्याच्या बाजूला असणार्‍या मानवी वस्त्या वाचल्या पण जेथे अशा वृक्षांचे संरक्षण कवच नाही. तेथे मृत्यूने हाहाकार माजविला हे सर्वश्रुत आहे. समुद्राच्या प्रलयकारी लाटा तटवण्याचे सामर्थ्य झाडात आहे पण माणसात नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे. 

शासनाने घाटांच्या दरीच्या बाजूने संरक्षक कठडे बांधले तरी ते संपूर्ण सुरक्षिततेची हमी देतीलच हे सांगता येत नाही. मात्र, कठड्याच्या खालच्या टापूत साग, ऐन, किंजळ सारख्या मजबूत वृक्षांची लागवड केल्यास निदान भविष्यात अशा हृदयद्रावक घटनांना सामोरे जावे लागणार नाही.

अलीकडे रस्त्यावरून प्रवास करणार्‍या वाहनांच्या संख्या प्रचंड वाढली आहे. वाहनांच्या संख्येच्या मानानेे रस्त्याचे रूंदीकरणांचे काम धोक्याचे आहेत. घाटाच्या वरच्या बाजूचा कडा कापून रस्ता रूंद करावा तर भूउत्खननाचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे दरीची बाजू भक्‍कम करणे हेच आपल्या हातात आहे. संरक्षित वृक्षांची मालिका तयार केल्यास आंबेनळीसारख्या बहुतांशी घटना टळता येतील.