Thu, Jun 27, 2019 18:12होमपेज › Konkan › युती, स्वाभिमान जोमात; आघाडी कोमात

युती, स्वाभिमान जोमात; आघाडी कोमात

Published On: Apr 16 2019 2:17AM | Last Updated: Apr 15 2019 11:55PM
राजापूर : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ येत असतानाच राजापूर विधानसभा क्षेत्रात शिवसेना व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा जोरदार प्रचार सुरु असून त्यामानाने आघाडीच्या प्रचारात सन्नाटा जाणवत आहे.

शिवसेना - भाजप महायुतीचे उमेदवार विनायक राऊत व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार नीलेश राणे यांची प्रचार यंत्रणा जोमाने कामाला लागली असून तालुक्यात अनेक ठिकाणी पार पडलेल्या त्यांच्या  सभांना चांगला प्रतिसाद लाभल्याचे दिसत आहे. शिवसेना उमेदवार विनायक राऊत यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी प्रचारात गुंतले असून रत्नागिरीचे पालकमंत्री रविंद्र वायकर यांची प्रचारसभा पार पडली आहे. तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खा. नारायण राणे, त्यांचे उमेदवार नीलेश राणे व पक्षाचे पदाधिकारी किल्ला लढवत आहेत.त्यांच्याही सभा पार पडल्या आहेत मात्र या मतदार संघात काँग्रेस आघाडीचा  प्रचार त्यामानाने जाणवत नाही. दोन्ही काँग्रेसमधील संवादाची निर्माण झालेली दरी अजून बुझविण्यात यश आलेले नाही.  त्यामुळे महाआघाडीचा एकत्रीत प्रचार पहायला मिळत नाही .या लोकसभा मतदार संघात अद्याप कुठल्याच बड्या नेत्याची प्रचारसभा झालेली नसून मतदानाला असलेले मोजकेच दिवस लक्षात घेता अशी कुणा नेत्याची सभा होईल, असे दिसत नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवरील नेते व कार्यकर्त्यांना किल्ला लढवावा लागणार आहे.

मतदारसंघातील कळीचा मुद्दा ठरणार्‍या रिफायनरी प्रकल्पाचे सावट या निवडणुकीवर दिसणार हे समर्थकांकडून दाखल करण्यात आलेल्या पंढरीनाथ आंबेरकर यांच्या अपक्ष उमेदवारीवरुन स्पष्ट झाले आहे. तालुक्यात ज्या नाणार परीसरात रिफायनरी प्रकल्प होणार होता,  त्या गावांलगत आंबेरकर यांचा गाव असून सुरवातीपासूनच ते व त्यांचे सहकारी प्रकल्प समर्थक राहिले आहेत. त्यामुळे प्रकल्प समर्थक म्हणून  मतदार त्यांना कसा प्रतिसाद देतात, हे महत्वाचे ठरणार आहे. रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघांतर्गत राजापूर विधानसभा मतदारसंघातील प्रचार यंत्रणा संपूर्ण लोकसभेच्या मतदारसंघाचा केंद्रबिंदू राहिल अशी शक्यता वर्तविली जात आहे.